खेळ खेळाडू
Trending
एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी पुणे सज्ज, मार्चमध्ये प्रेक्षक क्षमता व तिकिटाबाबत होणार निर्णय

महावार्ता न्यूज: पुण्यात मार्चमध्ये होणार्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे आयोजन करण्यात आले असून ही मालिका मार्च महिन्यामध्ये होणार आहे. या सामन्याच्या आयोजनासाठी एमसीए सज्ज असून त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे मानद अध्यक्ष विकास काकतकर म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय संपूर्ण मालिकेचे आयोजन पुण्यामध्ये पहिल्यांदाच होत असून महाराष्ट्राच्या क्रिकेट विश्वामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. हे सामने २३ मार्च (मंगळवार), २६ मार्च (शुक्रवार) आणि २८ मार्च (रविवार) दिवस-रात्र मध्ये खेळविण्यात येणार आहेत.
भारतीय दौर्यावर आलेल्या इंग्लंड संघाची कसोटी मालिका सुरू असून दुसर्या कसोटीनंतर १-१ अशी बरोबरी निर्माण झाली आहे. उर्वरित कसोटी सामने तसेच टी-ट्वेन्टी मालिका आणि एकदिवसीय सामन्यांसाठी क्रिकेट रसिकांमध्ये आत्तापासुनच उत्सुकता वाढली आहे.
पुण्यात होणार्या या एकदिवसीय मालिकेसाठीची तयारी जोरदार सुरू असून खेळपट्टी (‘विकेट’) तसेच मैदानाचे ‘आऊटफिल्ड’ याकडे विशेष लक्ष देऊन सज्ज करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही संघांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान मिळण्याच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू आहे. सलग तीन सामने या मैदानावर होणार असल्याने प्रत्येक सामना हा नवीन आणि ताज्या खेळपट्टीवर खेळविला जावा, यासाठी ३ मुख्य खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांनी एमसीए स्टेडियम मधील सुरक्षितता आणि संपूर्ण स्टेडियमची पहाणी ६ फेब्रवारी २०२१ रोजी केली.
बीसीसीआय अॅन्टी करप्शन युनिटचे (एसीयु) झोनल ऑपरेशन्स् व्यवस्थापक आलोक कुमार यांनीही स्टेडियमला भेट दिली. तसेच एमसीए स्टेडियमच्या सुरक्षिता योजना आणि त्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. बीसीसीआय अॅडव्हान्स् पार्टी व्यवस्थापक प्रशांत बिश्त तसेच स्टार स्पोर्टस् प्रतिनिधी यांनीही एमसीए स्टेडियमला भेट दिली व तयारीची व व्यवस्थेची पहाणी केली.
नुकत्याच झालेल्या एमसीएच्या अपेक्स कौन्सिलच्या बैठकीमध्ये स्टेडियमच्या ‘इन-स्टेडिया’ (जाहीरात) हक्क यासाठीच्या निविदा खुल्या करण्यात आल्या होत्या. यासाठी प्रत्येक सामन्यासाठी ३.३ करोड रूपये इतकी विक्रमी रक्कम एमसीएला मिळणार आहे. यावरूनच या एकदिवसीय मालिकेची उत्सुकता लक्षात येत आहे.
स्टेडियममध्ये किती टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीची परवानगी आणि त्याबाबतचे निर्णय मार्च महिन्याच्या सुरूवातीला होतील, असा अंदाज आहे. राज्य सरकारच्या योजनेनुसार आणि निर्णयानंतरच स्टेडियमचे तिकिट शुल्क आणि त्याची आसन क्षमता याचा अंदाज घेऊन त्या विषयीची घोषणा करण्यात येणार आहे.
या मालिकेतील एक सामना (२८ मार्च, अखेरचा सामना) हा मुंबई येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मुंबईहून संघ इंग्लंडला रवाना होणार असून त्यांना सोपे जाण्यासाठी हा सामना मुंबईला घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. परंतु यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
या मालिकेच्या यशस्वी आयोजनासाठी एमसीए ने कंबर कसली आहे. खेळपट्टी, प्रेक्षकांची आसन व्यवस्था यासारख्या इतर सगळ्या व्यवस्थेची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी राज्य सरकारच्या अंतिम घोषणेनंतर स्टेडियम आसन क्षमता तसेच सुरक्षितता उपाय याचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Share