मुळशीत संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी, पाण्यात बुडून 5 जणांचा दु्र्दैवी मृत्यू , पंचक्रोशीत शोककळा

नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या संपुर्ण कुटूंबाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची भीषण घटना पुण्यातील मुळशी तालुक्यात घडली आहे. पती-पत्नी व 3 मुलीं असा पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मुळशी तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले असून पुढील कार्यवाही चालू आहे.
याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळशी तालुक्यातल्या कोळवण जवळील वाळेण गावात शंकर दशरथ लायगुडे (वय ३८), पौर्णिमा शंकर लायगुडे (वय ३६), अर्पिता शंकर लायगुडे (वय २०), अंकिता शंकर लायगुडे (वय १३) आणि राजश्री शंकर लायगुडे (वय.१२) यांचा वळकी नदीतील डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ह
आज सकाळी दहा वाजता वळकी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी पौर्णिमा या चुकून पाण्यात पडल्या. तेव्हा त्यांना वाचविण्यासाठी तीनही मुली पाण्यात गेल्या. हे सर्व बुडतानाचे पाहून शंकर लायगुडे यांनी पाण्यात उडी मारली. या कुटूंबातील कोणालाही पोहता येत नसल्याने सर्व जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वाळेण गावावर शोककळा पसरली असूम मुळशीकर नागरिक दुःख व्यक्त करत आहेत.
मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीने मृतदेह बाहेर काढण्याची कारवाई केली. पुढील तपासणीसाठी हे मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले आहेत.