
तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वर निघालेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या १०० जणांना पोलिसांनी आतापर्यंत गजांआड केले आहे. या मिरवणुकीसाठी वापरलेल्या २७ आलिशान गाड्या आणि ६४ मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
पुणे शहर व ग्रामीणमधील गुन्ह्यांतून सुटल्यानंतर तळोजा कारागृहातून बाहेर येताना गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी महामार्गावर मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले; तसेच कोथरूड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा मिरवणूक काढून आदेशाचा भंग केला होता. या प्रकरणी १६ फेब्रुवारी रोजी दीडशे जणांवर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये सुरुवातीलाच गजा मारणेसह नऊ जणांना अटक केली. त्यांना कोर्टाने या गुन्ह्यात जामीन दिला आहे. मात्र, गजा मारणेच्या मिरवणुकीत गाड्या घेऊन सहभागी झालेल्यांची माहिती पोलिसांनी काढून त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली. गजा मारणे ज्या गाडीत बसला होती, ती गाडी वडगाव शेरी येथून एका व्यक्तीकडून मागून आणल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची आकडा शुक्रवारी १०० झाला आहे, अशी माहिती महावार्ता न्यूजला कोथरूडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घनश्याम डांगे यांनी दिली.
मिरवणूक काढल्याप्रकरणात मारणे आणि साथीदारांविरोधात वारजे, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय, पुणे ग्रामीणच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. मारणे आणि त्याच्या साथीदारांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात एक स्वतंत्र गुन्हाही दाखल आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गजा मारणेला साताऱ्यातून अटक केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई करून त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे
कुविख्यात गुंड गज्या मारणेला एका वर्षांसाठी अटक, पौड पोलिसांची दमदार कामगिरी
Share