पुणे
Trending

पुण्यात गिरीश बापट पोलिसांच्या ताब्यात, ‘मिनी लॉकडाउन’च्या पहिल्याच दिवशी भाजपाचं आंदोलन

वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर काल(दि.३) पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक निर्बंध लागू करण्यात आले. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली. यावेळी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याचीही घोषणा झाली. तसेच, पुणे पीएमपीएमएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याचंही जाहीर केलं. मात्र, भाजपाने पीएमपीएमएल बससेवा बंद करण्यास विरोध केला आहे. पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी भाजपाचे खासदार गिरीश बापट आणि माजी आमदार शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. यावेळी गिरीश बापट आणि जगदीश मुळीक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पीएमपीएल सेवा पुन्हा सुरू करा या मागणीसाठी गिरीश बापट यांनी वायरलेस व्हॅनमध्ये बसून आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. “दोन-तीन गोष्टींना आमचा विरोध आहे, पहिली गोष्ट म्हणजे पीएमपीएल बंद झाली नाही पाहिजे. कारण, पुण्यात राहणारा किंवा पुण्यात कामाला येणारा जो उद्योगधंद्यात काम करतो, तो जर येऊ नाही शकला तर हे सर्व उद्योग बंद पडतील. म्हणून कंपन्यांना विनंती करावी की, तुमची वाहनसेवा सुरू करून त्याद्वारे कामगारांना घेऊन जावं किंवा कामगारांसाठी वेगळी पीएमपीएएलची व्यवस्था करा, ओळखपत्र तपासा. उगाच इकडं तिकडं फिरणाऱ्यांवर बंधनं आणली तर आमचं काही म्हणणं नाही. कारण परिस्थिती हाताबाहेर जात आहे. पण, अशी अनेक घरं आहेत की दिवसभर काम नाही केलं तर संध्याकाळी चूल पेटत नाही. त्यांनी काय करावं? त्यांची आरोग्याची काळजी घेताना, त्यांच्या जीवनाची देखील काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणून पीएमपीएलच्याबाबतीत ५० टक्क्यांचा जो नियम होता तो ४० टक्क्यांवर करा, बाहेर जाणाऱ्या कामगारांना प्राधान्य द्या, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य द्या”, अशी मागणी बापट यांनी केली.
तसेच, हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्यासही त्यांनी विरोध केला आहे. हॉटेल पूर्ण बंद न ठेवता, उभं राहून खाण्याची व्यवस्था ठेवावी. पार्सल सुविधा रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवावी. जेणेकरुन बाहेरगावच्यांची उपासमार होऊ नये यासाठी हे महत्वाचं आहे. शहरातील हातगाड्यांवर पाच पेक्षा अधिक लोकं जमू नये, असंही बापट म्हणालेत.
दरम्यान, पुण्यात संचारबंदी काळात बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close