जगाच्या पाठीवर
Trending

साहेब, मुळशीतील विप्रो व शतायू रूग्णालयातील ऑक्सिजन सिलेंडर संपत आलाय…रूग्णांचे जीव धोक्यात आहे….काय घडले पुढे

मुळशी सजग तहसील यंत्रणेमुळे 105 रूग्णांचे वाचले प्राण, ऑक्सिजन सिलेंडरसाठी 24 तास यंत्रणा जागी

महावार्ता न्यूज ः शनिवारी हिंजवडीतील शतायू रुग्णालयातून तहसील कचेरी व हिंजवडी पोलिस स्टेशनला फोन आला. ’साहेब..ऑक्सिजन संपत आलाय, 25 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. ’ हे शब्द कानावर पडताच अधिकार्‍यांच्या काळजाचा ठोका चुकला. नाशिक घटनेत तडफडून मरण पावलेल्या रुग्णांचे चेहरे डोळ्यासमोर तरळू लागले. मुळशीचे तहसीलदार यांनी सिलेंडरसाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू केले दुसरीकडे हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी थेट रुग्णालय गाठलं, पोलिस यंत्रणेची सर्व शक्ती पणाला लावली. अवघी काही मिनिटे शिल्लक असताना रुग्णांचे प्राण वाचतील इतका ऑक्सिजन तहसीलदारांनी उपलब्ध करून दिला. त्यानंतर पोलिस यंत्रणेमुळे इतर ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला… अन् यंत्रणेचा जीव भांड्यात पडला.
गुरूवारी (दि. 22)हिंजवडीतील शासकीय विप्रो हॉस्पिटलमधील ऑक्सिजन सिलेंडर संपत आला होता. हॉस्पिटलच्या वरिष्ठांनी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, तहसीलदार यांना कल्पना दिली. तहसील यंत्रणेला ही माहिती मिळताच तहसीलदार अभय चव्हाण यांनी हिंजवडीतील रूबी हॉल क्लिनिकमधील 6 तर पौड येथील नियोजित कोव्हिड सेंटरसाठी आलेले 9 सिलेंडर तासाभरतच उपलब्ध करून दिले आणि विप्रो हॉस्पिटलमधील 80 रूग्णांचा धोका टळला.
शनिवारी पुन्हा अंगावर काटा उभा करणारा प्रसंग उभा राहिला. हिंजवडी येथील शतायू रुग्णालयात 25 रूण ऑक्सिजनवर आहेत. दरम्यान, शनिवारी (दि. 24) रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करणारी गाडी आलीच नाही. रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुपारी बारापर्यंत ऑक्सिजनचे नियोजन होऊ शकले नाही. शेवटी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण व पोलिस निरीक्षक सावंत यांना याबाबत कळविण्यात आले. सावंत यांनी रुग्णालयात धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांना रुग्णांचे अनभिज्ञ नातेवाईक इतरत्र बसल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता एक ते दीड तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असल्याचे सांगून काहीतरी करा, अशी विनवणी डॉक्टरांनी त्यांना केली. दुसरीकडे तहसीलदार अभय चव्हाण यांना डॉक्टर व नातलगांचे फोन आले. सजग तहसील यंत्रणेची ऑक्सिजनसाठी प्रयत्न सुरू झाले.
तहसील आणि पोलिस यंत्रणेने फोनाफोनी करून संबंधित विभागांवर दबाव तयार केला. शहरातील इतर रुग्णालयात देखील पोलिस पाठवून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक तास उलटूनही ऑक्सिजन मिळत नव्हता. डॉक्टरांचे फोन येत होते. मात्र, केवळ काही मिनिटे हातात असताना ऑक्सिजनची सोय होत नसल्याने तणाव वाढत होता. शतायू रुग्णालयाची एक गाडी चाकण येथील एका प्लॅन्टवर थांबून होती. मात्र, तेथे देखील ऑक्सिजनसाठी मारामार सुरू होती. एक-एक सेकंद महत्वाचा होता. शेवटी पोलिसांनी मनाची तयारी करून रुणालयाभोवती बंदोबस्त वाढवला. अचानक वाढलेला बंदोबस्त पाहन रुग्णांच्या नातेवाईकही सैरभैर होऊ लागले. नेमके काय होतंय याची कोणालाच कल्पना नव्हती. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह होती. ही बातमी बाहेर जाऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.
मुळशी तहसील यंत्रणेकडून वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरूच होते. शेवटी तहसीलदार चव्हाण यांनी बावधन येथील चेलाराम रुग्णालयाकडून माघारी देण्याच्या बोलीवर 3 सिलेंडरची व्यवस्था केली. तीन सिलिडर पोहचवल्यानंतर ताण काही अंशी कमी झाला होता. मात्र,संकट टळले नव्हते. रुणालयातील 25 रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी पोलिसांची विविध पथके शहरातील रुग्णालये,ऑक्सिजन प्लांट, खासगी कंपन्यांची दारे ठोठावत होती. अखेर पुन्हा तहसील यंत्रणेला यश आले. प्रयत्नांती परमेश्वर, या उक्तीप्रमाणे एमआयडीसी भोसरी येथील सहानी गॅस एजन्सीकडे ऑक्सिजन असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, लगेचच अन्न औषध प्रशासनाच्या मार्फत तहसीलदारांनी सहानी एजन्सीला संपर्क केला. तहसील व पोलिसांचा प्रयत्नांना शेवटी यश मिळाले. काही वेळातच ऑक्सिजनचा टँकर स्ग्णालयात दाखल झाला आणि रूग्ण वाचले.
मुळशीतील रूग्णांलयांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून 24 तास तहसील यंत्रणा जागी आह. चाकण येथील ऑक्सिजन प्लाँट बाहेरच आमची यंत्रणा 24 तास तैनात आहे. मुळशी तहसील 4 पदाधिकारी चाकण येथे 12 तास सेवा देणार असून मुळशी तालुक्याया वाट्याचा सिलेंडर तातडीने मिळण्यासाठी प्रयास करीत आहे. विप्रो व शतायू रूग्णांलयात वेळीच सिलेंडर उपलब्ध करून दिले. आजही काही रूग्णांलयाकडून मागणी आहे, आम्ही प्रयत्न करीत आहोत. पौडमधील ग्रामिण रूग्णांलयातील 9 सिलेंडर विप्रोला देण्यात आले आहेत. ते परत येताच पौड येथील ऑक्सिजन यंत्रणा सुरू केली जाणार आहे.
– अभय चव्हाण, तहसीलदार, मुळशी

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close