
महावार्ता न्यूज: महाराष्ट्रात तालुकास्तरावर बांधण्यात आलेल्या मुळशी तालुक्यातील पहिल्या पत्रकार भवनाचा सहावा वर्धापन दिनानिमित्त समाजातील गरजु व्यक्तींना
2 लाख 80 हजारांची मदत करून अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
पत्रकार संघ मुळशीच्या वतीने मुळशी तालुक्यातील पौड येथे लोकसहभागातून पत्रकार भवनाची भव्य अशी दुमजली इमारत उभारली आहे. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर या भवनाचा सहावा वर्धापन दिन अत्यंत साध्या पद्धतीने व समाज उपयोगी उपक्रम करून साजरा करण्यात आला.
मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार, पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, उद्योजक माधव शेळके, श्री शिवसमर्थ बचत गटाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ससार यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर व इमारतीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार संघ मुळशी, आबासाहेब शेळके मित्रमंडळ व श्री शिवसमर्थ बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने 30 कुटुंबियांना अन्न धान्य किटचे वितरण करण्यात आले. माण ग्रामपंचायत व सभापती पांडुरंग ओझरकर यांच्या सहकार्याने पत्रकारांना कोरोना प्रतिबंधक कीटचे वाटप करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक सदावर्ते व त्यांचे परदेशात असणारे जावई रोहित पै यांच्या सहकार्याने कोरोना होऊन गेलेल्या पेंशटची ऑक्सिजन पातळी सुधारण्याकरिता तालुक्यासाठी तीन ऑक्सिजन कोन्सिलीटर संच भेट देण्यात आले. ही सर्व मदत 2 लाख 80 हजारांपेक्षा अधिक आहे
प्रास्ताविक करताना पत्रकार अध्यक्ष रमेश ससार यांनी कोरोना काळात पत्रकारांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा मांडला.
या समारंभास पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष धोंडिबा कुंभार राजेंद्र मारणे, दत्तात्रय सुर्वे, आंतर राष्ट्रीय क्रीडापत्रकार व महाावार्तचे संपादक संजय दुधाणे, सकाळचे उपसंपादक निलेश शेंडे,गोरख माझीरे, साहेबराव भेगडे,किसन बाणेकर, रामदास दातार, महादेव पवार, कालिदास नगरे , बाबासाहेब तारे, शाकिर शेख, शुभम शेळके,मुबिया कंपनीचे एच आर मॅनेजर अतुल पिसाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रदीप पाटील यांनी तर आभार संघाचे उपाध्यक्ष सागर शितोळे यांनी मानले.
Share