
महावार्ता न्यूज ः काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळं रिक्त झालेल्या राज्य विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसनं आमदार संग्राम थोपटे यांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे. या पदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेस हायकमांडनं थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सूत्रांकडून समजतं.
बाळासाहेब थोरात यांच्याकडील एक जबाबदारी काढून घेत काँग्रेसनं काही महिन्यांपूर्वी नाना पटोले यांच्याकडं प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळं पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होतं. त्यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती. पावसाळी अधिवेशन तोंडावर असल्यानं याबाबतच्या घडामोडींना वेग आला होता. नाना पटोले यांनी या संदर्भात दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनंही विधानसभा अध्यक्षपदावर दावा ठोकल्याची चर्चा होती. त्यामुळं संभ्रम निर्माण झाला होता.
महावार्ताची भविष्यवाणी पुन्हा खरी ठरणार
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार येईल असे भाकित महावार्ता न्यूज पोर्टलने विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी केले होते. तसेच भोर-मुळशी- वेल्हयाचे आमदार संग्राम थोपटे हे विधानसभेचे अध्यक्ष होतील असे गत दोन अधिवेशनाच्या वेळी बातमी प्रकाशित करून जगजाहिर केले होते. आता संग्राम थोपटे हेच विधानसभेचे अध्यक्ष असतील असे वारे पुन्हा वेगाने वाहत असल्याने महावार्ताची भविष्यवाणी पुन्हा एकदा खरी ठरणार आहे.
अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार हे निश्चित झाल्यानंतर विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार व नितीन राऊत यांची नावं पुढं आली होती. विधानसभा अध्यक्षपदी यापैकी एकाची नियुक्ती करून त्यांचं मंत्रिपद पटोले यांना दिलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र, त्यामुळं पक्षात बरेच फेरबदल करावे लागणार होते. तूर्त काँग्रेसनं हे फेरबदल टाळल्याचं दिसत आहे. त्याऐवजी पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची या पदासाठी निवड केल्याचं समजतं.
बाळासाहेब थोरात म्हणाले…
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना याबाबत विचारलं असता, ‘या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्ष निवडले जाणार असून ते काँग्रेसचे असतील, असं त्यांनी सांगितलं. संग्राम थोपटे यांनी कालच बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यांच्यात एक बैठकही झाली होती. त्या बैठकीस उपस्थित असलेल्या आमदारानं थोपटे यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे.
Share