जगाच्या पाठीवर
Trending
३६ वा वाढदिवस ३६ किलोमीटर धावून केला साजरा, हिंजवडी पोलिस स्टेशनमधील विजय घाडगेंचा आदर्श उपक्रम

महावार्ता न्यूज ः मुळशी तालुक्यातील हिंजवडी स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपला ३६ वा वाढदिवस ३६ किलोमीटर धावून साजरा करत समाजात फिटनेस विषयी एक आदर्श निर्माण केला आहे. विजय घाडगे असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. खर तर विजय हे नुकतेच करोनावर मात करुन बाहेर आले असून त्यांना दोन वेळेस कोविडने गाठले परंतु, नावाप्रमाणे त्यांनी कोविडवर विजय मिळवला आहे.
पोलीस अंमलदार असलेले विजय हे गेल्या अडीच वर्षापासून धावण्याचा सराव करत आहेत. विजय यांचं वजन ९० पेक्षा जास्त होतं. आपल्या शरीरावरील ताबा सुटत चालला आहे, अस त्यांना वाटलं आणि त्यांनी रनिंग सुरू केली अस त्यांनी सांगितलं. विजय यांनी ठरवलं होतं की, ३६ वा वाढदिवस हा ३६ किलोमीटर धावून साजरा करायचा. परंतु, काही महिन्यांनी त्यांच्या समोर कोविडच आव्हान उभं राहिलं. मात्र, इतक्यात त्यांनी हार मानली नाही. कोविड झाला असताना कोविड सेंटरमध्ये त्यांनी आपला सराव सुरूच ठेवला.
वाढदिवसानिमित्त विजय घाडगे यांनी सोशल मिडियावर केलेले आवाहन
नमस्कार …
सर, उद्या 9 जुलै रोजी मी माझ्या वयाची 36 वर्ष पुर्ण करत आहे, मी हा माझा वाढदिवस 36 कि.मी. रन करून साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे, मला तुमच्याकडून अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा आहे … आणी माझा हा दिवस स्पेशल करण्या साठी तुमच्या कडुन ही मला असच ३६ च्या आकड्यातल अनोख गिप्ट मिळाव अशी माझी अपैक्षा आहे जस की 36 कि.मी रनिगं, 36 कि.मी. सायकलिंग, 36 मिनिट पळणे, 36 मिनिट चालणे, 36 सूर्यनमस्कार, 36 पुशअप्स, 36 स्क्वाट्स, 36 सिटअप्स, 36 च्या आकड्यातील कुठलाही व्यायाम प्रकार पुर्ण करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास माझ्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित होईल…
धन्यवाद
कोविड मधून बाहेर पडून अवघे २० दिवस झाले असताना त्यांनी ३६ किलोमीटर धावून वाढदिवस साजरा केला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदर्श पुढे ठेवून ध्येयपूर्ती केल्याचं त्यांनी सांगितलं. यात, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमरे यांनी विजय यांना मोलाची साथ दिली. त्यांनी देखील विजय सोबत ३६ किलोमीटर धावून त्यांना अनोख्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सध्या धावपळीच्या जगात स्वतःकडे सर्वांनी लक्ष देत फिटनेसमध्ये राहील पाहिजे, असे आवाहन त्यांनी तरुण पिढीला केलं आहे. तसेच पुढे येणारा प्रत्येक वाढदिवस अशाच पद्धतीने धावून साजरा करणार असल्याची भावना विजय यांनी व्यक्त केली आहे.
Share