पुणे
Trending

ग्रामपंचायतीची लुडबुड थांबताच, हिंजवडीत सुरळीत लसीकरण

महावार्ता न्यूज ः  लसीकरण मोहिमेत ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप वाढल्याने सर्वसामान्य नागरिक लसीकरणापासून वंचित झाला होता. हि बाब प्रसार माध्यमांसह गावातील त्रस्त नागरिकांनी उघडकीस आणून दिली होती, याची गंभीर दखल घेवून प्रशासनाने ग्रामपंचायतीला हस्तक्षेप न करण्याची सक्त ताकीद दिली. त्यामुळे लसीकरनातील अखेर हस्तक्षेप थांबला आणि हिंजवडीत सुरळीत लसीकरणाला सुरवात झाली आहे.
आलेल्या लसीवर हिंजवडीत ग्रामपंचायत स्तरावर वाटाघाटी केल्या जात असल्याचे बोलले जात होते. फॉर्मवर चक्क हिंजवडी ग्रामपंचायतिचे शिक्के मारून आपल्या जवळचा मित्र, नातलग अशा लोकांना लसीचे डोस देण्यास सुरवात केली होती. लसीचा कोटा वाटून घेण्यावरून काही सदस्य नाराज असल्याची देखील चर्चा होती. एवढेच नाही तर ‘कुणी लस देता का लस’ या आशयाचे त्रस्त नागरिकाने हिंजवडीत भर चौकात ठिकठिकाणी फ्लेक्स लावले होते. महत्वाचे म्हणजे हे अनधिकृतपणे फ्लेक्स कुणी लावले याचा शोध घेवून संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी ग्रामपंचायत करू शकली असती. परंतु स्वताचेच हात दगडाखाली असल्याने सर्वजण मुग गिळून गप्प बसल्याची देखील चर्चा आहे.
या सर्व बाबींची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. लसीकरण प्रक्रियेत ग्रामपंचायतीचा हस्तक्षेप तात्काळ थांबविण्याच्या सक्त सूचना दिल्या असल्याचे गटविकास अधिकारी संदीप जठार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित करंजकर यांनी सांगितले.ग्रामपंचायतचा हस्तक्षेप बंद होताच हिंजवडीत सुरळीत लसीकरण सुरू झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांना लस भेटू लागली आहे. परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात लसीचे डोस कमी येत असल्याने डोसची संख्या वाढवून देण्याची मागणी देखील नागरिकांमधून होत आहे.
लसीकरणाबाबत घडलेला प्रकार हा हिंजवडीमध्ये उघडकीस आला असला तरी तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीमध्ये देखील असाच सावळा गोंधळ सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे देखील जातीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close