महावार्ता दिवाळी 2021
Trending

मुळशी पॅटर्न नव्हे, हवे मुळशी पर्यटन

संदीप लांडगे

महावार्ता दिवाळी 2021

गुगल वर ’मुळशी’ असा शब्द सर्च करता च ’मुळशी पॅटर्न’ अशाच आशयाचा मजकूर ऑप्शन मध्ये आपल्या डोळ्यासमोर येतो ;आणि मनात एकच प्रश्न निर्माण होतो की, हीच आपल्या मुळशी ची ओळख आहे का? की चित्रपटात दाखवल्याप्रमाणे गुन्हेगारी, गँगवार, खून, मारामारी हेच मुळशीचे वैभव आहे का ?असे असंख्य प्रश्न मनात गर्दी करतात.
खरं तर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला मुळशीचा भाग आज वेगळ्या स्वरूपात जगासमोर येत आहे. काही अंशी हे स्वरूप खरं असलं तरीही हीच परंपरा माझ्या मुळशीची नाही यात तिळमात्र शंका नाही. इतिहासात डोकावताना गांधीवाद स्वीकारणारा मुळशी सत्याग्रह हीच मुळशी ची खरी ओळख होती. 16 एप्रिल 2021 रोजी मुळशी सत्याग्रहा ला शंभर वर्ष पूर्ण झाली. धरणग्रस्तांचे जगातले पहिले आंदोलन हे याच मुळशीत उभं राहिल होतं. या धरणग्रस्तांच्या आंदोलकांचे नेते हे विश्वासराव भुस्कुटे होते. या आंदोलनासाठी महात्मा गांधींचा पाठिंबा मिळविण्याकरिता मुंबई येथे विनायकराव दाखल झाले होते. महात्मा गांधीनी आंदोलकांना अहिंसात्मक सत्याग्रहाचा मार्ग दाखविला .यावेळी सावरकरांचे शिष्य असणारे तात्या बापट यांच्याशी विनायकराव यांची भेट झाली. तात्या बापट अर्थात सेनापती बापट यांनी या या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात शेतकरी वर्ग आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या .अहिंसेच्या मार्गाने हा सत्याग्रह तीन वर्षे चालला होता. गांधीवादाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लढा देणार मुळशी तालुका ते गुन्हेगारीचा पॅटर्न म्हणून तयार झालेला तालुका अशी ओळख माझ्या मुळशीची व्हावी ही अतिशय गंभीर बाब आहे.


याच्या मुळाशी जाऊन कारणांचा शोध घेत असताना काही गोष्टी इकडे मनात असूनही कानाडोळा करता येत नाही. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे इथल्या जमिनींना आलेला सोन्याचा भाव. कारण तालुक्यातून कोकणात जाण्यासाठी तयार झालेल्या महामार्गामुळे इथे जमिनीं चा भाव वाढला. त्यातच आयटीपार्क विविध कंपन्यांमुळे पर्यटकांमुळे जमिनीचे भाव गगनाला भिडले .त्यामुळे आपल्या जमिनी इतरांना विकण्यासाठी गावोगावी एजंट अर्थात दलाल तयार झाले .भावा -भावात भाऊ -बहिणीत जमिनीच्या पैशावरून कटुत्व वाढत राहिले. हे नात्यातील वाद इतके विकोपाला गेले की त्यातून खून पडायला लागले .कमी वयात कमी प्रयत्नात जास्त पैसा हातात आल्यानं महागड्या गाड्या,विलासी जीवनाकडे तरुण आकर्षित होऊ लागला त्यातच तालुक्यात 2008 पर्यंत उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे शिक्षणासाठी तरुणाई पुण्यासारख्या शहराला पसंती देऊ लागली. गावाकडच्या जमिनी विकून अनेकांनी झोपडपट्ट्यांमध्ये खोल्या घेऊन राहायला सुरुवात केली जमिनीचा पैसा संपल्यावर मिळेल ते काम करताना मुळशीतला नागरिक दिसू लागल पैशाच्या हव्यासापोटी जमिनी गेल्या;आणि कालांतराने पैसाही संपला छोट्या-मोठ्या कारणातून गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेली तरुण मुलं, प्रोफेशनल गुन्हेगार होण्यासाठी अधिक प्रयत्न करू लागली. त्यासाठी खंडणी ,वेळ पडली तर खून करण्यासही पोरं तयार असायची .सराईत गुन्हेगारांनी या मुलांचा वापर करून घेतला. परिणामी अधोगतीला चालना मिळत गेली.

तालुक्यातील नागरिकांसाठी शहरातीशहरात स्थलांतर हे नवं नव्हतं. कारण कित्येक दशकं आधी तालुक्यातील लोक हे मुंबई पुण्यामध्ये नोकरी-व्यवसायासाठी स्थायिक होत होते. पुण्यातील मार्केट यार्ड येथील हमाल, मुंबईतील गिरणी कामगार, गोदीतील हमाला मध्ये तालुक्यातील लोकांचे प्रमाण हे पहिल्यापासून बर्‍यापैकी होतं. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक पैलवान मंडळी ही पुण्यातील कोल्हापूरमधील तालमीमध्ये सरावासाठी राहत होते. कुस्ती आणि पैलवानकी हे या तालुक्याचे खर्‍या अर्थाने भूषण म्हणावे लागेल.
आज महाराष्ट्राला दरवर्षी एक नवा महाराष्ट्र केसरी मिळत आहे याचे कारण म्हणजे स्वर्गीय कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या प्रयत्नामुळे च. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ हे याच तालुक्यातील मुठा गावचे. मामा साहेब एक अष्टपैलू व्यक्तिमत्व .कला, क्रिडा, साहित्य ,उद्योग विश्व ,शिक्षण क्षेत्र ,राजकारण अशा विविध क्षेत्रात मामा साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. त्यांच्याच पुढाकाराने तालुक्यांमध्ये माध्यमिक शिक्षणाची सोय खेड्यापाड्यापर्यंत झाली मामासाहेब मोहोळ तालुक्याचे मानाचे पान आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कुस्ती मुळे तर हा तालुका राष्ट्रीय पातळीवर आजही ओळखला जातोय. महाराष्ट्र केसरी स्वर्गीय अमृता मोहोळ आणि हिंदकेसरी अमोल बुचडे हे याच तालुक्यातील मौल्यवान रत्न आहेत यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अनेक कुस्तीगीर आपापल्या परीने कुस्तीला आणि तालुक्याच्या नावलौकिकाला मोठं करण्याचा प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील पहिलवानांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दर वर्षी मुळशी केसरी प्रतिष्ठानच्यावतीने मुळशी केसरी स्पर्धा आयोजित केली जात आहे. त्याचबरोबर चेतन अधवडे सारखा एक उमदा पहिलवान माले केसरी सारखे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून पैलवान की साठी प्रोत्साहन देत आहे.
तालुक्यातील नागरिकांचे वाढते स्थलांतर यामुळे मर्यादित झालेल्या लोकसंख्येमुळे हा तालुका विधानसभेसाठी भोर वेल्हा यांच्याशी जोडला गेला आहे .यापूर्वी तालुक्यातून स्वर्गीय मामासाहेब मोहोळ, नामदेव राव मते, विदुरा नवले, अशोकराव मोहोळ ,कुमार गोसावी, शरद ढमाले यांनी विधानसभेत तालुक्याचे प्रथम नागरिक अर्थात आमदार म्हणून काम पाहिले आहे. या सर्वांच्या प्रयत्नाने तालुक्याच्या विकासात भर पडली असली तरी वर्तमानात तालुक्याचा विकास हा प्रगतीपथावर आहे असे म्हणण्यास जीभ रेटत नाही. याचे कारण म्हणजे एक दशकाहून अधिक काळ तालुक्याचे नेतृत्व करणारा भूमिपुत्र विधानसभेत नाही.

वास्तविक पाहता पुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असणारा मुळशी तालुका मावळ, खेड, शिरूर ,दौंड, पुरंदर ,भोर आणि वेल्हा यांच्यासोबत भौगोलिक दृष्ट्या पुणे शहराला जोडलेला मुळशी आज समतोल विकासाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तालुक्याच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वताचा डोंगराळ भाग आहे .हा तालुका 1948 पूर्वी मुळशी पेटा या नावाने ओळखला जात होता .या मुळशी पेटा मध्ये सध्याचे मोठा खोरे, कोळवण खोरे, रिहे -आंधळे इत्यादी खोरे यांचा समावेश होता. मुळशी पेटा हा तांदूळ उत्पादनात अग्रेसर होता. तांदळाच्या आंबेमोहर या वानास पुण्यातील बाजारपेठेत प्रचंड मागणी होती . आजही तालुक्यात भाताचे पीक आणि नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते . धरणाचे पाणी आणि तलावामुळे आजचा शेतकरी हा बागायती शेती कडे वळताना दिसतोय. पण म्हणावे असे यश त्याच्या पदरी येताना दिसत नाही.

कोरीगड हे या तालुक्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. मुळशी तालुका हा कोरीगड धनगड कैलास गड तैल बैल तिकोना किल्ला तामिनी घाट अंधार बंद मुळशी धरण टेमघर धरण इत्यादी ऐतिहासिक किल्ले आणि नैसर्गिक स्थळांनी नटलेला आहे सहारा लेख सिटी व लवासा हिल गिरीस्थाने हिंजवडी आयटी पार्क देखील याच तालुक्यात आहे या तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य आजही पर्यटकांना आकर्षित करत आहे. एवढेच काय शहरातील लोकांना निवांत क्षण निसर्गाच्या सानिध्यात जगता यावा यासाठी अनेक शहरवासीय मुळशी तालुक्याला सेकंड होम म्हणून पसंती देत आहे.
तालुक्यात अशी असंख्य शक्तिस्थळे असली तरी हा समतोल विकास गुन्हेगारी पार्श्वभूमी उच्च शिक्षणाचा अभाव अशा उंबरठ्यावर उभा असलेला माझा तालुका विकासाच्या संक्रमणावस्थेतून जात आहे. भविष्यात इथला तरुण कला क्रीडा साहित्य राजकारण अशा विविध क्षेत्रात आपला नावलौकिक राष्ट्रीय पातळीवर उंचावेल अशी आशा आहे.
थोडक्यात मुळशी तालुक्याविषयी संत तुकाराम यांच्या भाषेत सांगायचे झाले तर, भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाच्या माथी हाणू काठी॥
अशा विचारधारेचा असणार्‍या या माझ्या मातीचा आणि तालुक्याचा मला सार्थ अभिमान आहे.
संदीप विलास लांडगे
एम. ए. ,बी.एड.,सेट.
गाव मुठा ,तालुका मुळशी, जिल्हा पुणे. सहायक प्राध्यापक
पु. जि. शि. मं. शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापुर

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close