
महावार्ता दिवाळी 2021
सन 1922 च्या सुमारास मुळशी धरणाचे काम सुरू झाले. ब्रिटीश सरकारला सोबत घेऊन टाटा सारख्या बलाढ्य व्यापार्यांनीं भाग भांडवल उभे करून मुळशीत एक खाजगी धरण उभं केलं..
अन तत्कालीन अभद्र युतीने मावळात असणारा शेतकरी देशोधडीला लागला. आंबेमोहोर भाताची रास असणारा सगळा प्रांत जलमय झाला. गावच्या गाव रिकामी झाली. तळातला शेतकरी आहे ते सोडून डोंगराच्या मध्याला येऊन राहू लागला.
नव्या जोमाने सुरवात करून डोंगराच्या कड्या कपरिला नव्याने भात खाचर करून तयार करुन, पुन्हा भात शेती करु लागला. पुर्वीच्या काळी आज काल सारखी जेसीबी, पोकलंड सारखी यण्त्रे नव्हती ही खाचरे बनविण्यासाठी. केवळ मनुष्य बळ व बैलजोडी यांच्या जीवावर आपल्या मावळ भागातील पुर्वजांनी नवा डाव सुरु केला. आणि आज मुळशीतील इंद्रायणी तांदुळ एक विशेष ओळख निर्माण करुन आपले स्थान बनवुन आहे. मावळातील लोकांनी जरी शेते तयार केली तरी त्यांनी कधी आपल्या शेतांना कुंपणे केली नाहीत. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहांना अनुरुप अशीच नवनवीन भात खाचरे बनविली गेली. मातीची झीज होणार नाही याची देखील दक्षता घेतली गेली. मुळशीतील मावळ भाग पुन्हा एकदा जोम धरु लागला.
अन पुन्हा एकदा, मुळशीला नजर लागली. आपल्याच स्थानिक पुढा-यांनी शहरातील धनदांडग्यांना फार्म हाऊस, रिसॉर्ट्स बनविण्यासाठी, जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी, शेतक-यांच्या जमिनी विकुन त्यातुन मिळणा-या कमिशन साठी, मुळशी विकायला काढला. भातखाचरे जरी शिल्लक असली थोडी फार तरी मुळशीच्या मावळ भागात, डोंगरच्या डोंगर विकले जाऊन, डोंगर-उतारांवर तारेची, भिंतीची कुंपणे पडु लागली. नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले गेले. काही ठिकाणी अक्षरशः सुरुंग लावल्यासारखे डोंगर पोखरुन घाढले जात आहेत. यात मातीची होणारी धुप, आपणा सर्वांसाठीच खुप हानिकारक आहे.
ज्या पद्धतीने हे सर्व दिवसा ढवळ्या सुरु आहे, यावरुन असे वाटते की या सर्वांस प्रशासनाचा अंतरंग पाठींबा आहे. तलाठ्यांनी अशा अनधिकृत उत्खणनाबाबत योग्य ते पंचनामे करुन, त्वरीत हे सारे थांबविणे गरजेचे होते पण असे कुठेही होताना दिसत नाही. याला साथ मिळते ती स्थानिक जमीन एजंटांची. आणि कित्येकदा हे जमीन एजेंट गावाचेच प्रतिष्टीत गावकरी असतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पद भुषविणारे पुढारी असतात.