
आपण तरिले नवलच नाहीं । इतरांशीं तारील तोचि खरा ॥
संत ज्ञानेश्वर माऊली, जगत्गुरू तुकाराम महाराज या थोर संतांच्या मांदियाळीतील प्रेमनिधी गणोरेबाबा कलियुगातील महान सत्पुरुष 19 व्या शतकात भूतलावर अवरतले. ‘ॐ हरिराम विठ्ठलाय नम:’ हा कलियुगाचा महामंत्र व ‘ॐ हा गुरू ’ ग्रंथाची दिव्य देणगी देणारे श्री बाबा क्षणभरातच आपल्या मधुर वाणीने समोर असलेल्या माणसांना आपलेसे करून घेत. पारंपारिक शिवणकामांचा कर्मयोग आणि नामजपाद्वारे प्रकटलेल्या भक्तीयोगातून सामान्य माणूसही संतपदावर रूढ होतो हे बाबांच्या जीवनचरित्राद्वारे जगाने अनुभवले.

श्री बाबांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात 19 डिसेंबर 1918 रोजी झाला. सात्विक शिंपी कुंटुबात जन्मलेल्या श्री बाबांचे आई-वडील पारमार्थिक होते. पारतंत्र्याच्या काळात शिक्षणाचे महत्त्व नसल्याने श्री बाबांचे शिक्षण कसंबसं चौथ्या इयत्तेपर्यंत झाले. बालवयातच घरच्या गरिबीमुळे त्यांना कुठे ना कुठेतरी मोलमजुरी करावी लागली. पुढे वयात आल्यानंतर श्री बाबांनी पोटापाण्याच्या शिवणकामाचे शिक्षण मोठ्या ध्यासाने, कष्टाने पूर्ण करून 1936 साली भगूरला वडिलोपार्जित शिवणकाम व्यवसायात जम बसविला. दिवस आनंदात चालले असल्याचे पाहून वयात आलेल्या 21 वर्षीय श्री बाबांचे 1937 साली सिन्नर तालुक्यातल्या नायगावचे शंकर तात्याबा वारे यांची सुशील कन्या सीता हिच्या बरोबर श्री बाबांचा विवाह संपन्न झाला. या लग्नाचा खर्च श्री बाबांनी स्वकष्टार्जित पैशांनी केला. लग्न फक्त 80 रूपयांमध्ये पार पडले होते.
संसार थाटून, घरचा गाडा सुरळीत करूनही श्री बाबांना स्वस्थता नव्हती. ते दिवस पारतंत्र्याचे होते. जन्मदात्या आईला सुखी केल्यानंतर भारतमातेच्या स्वातंत्र्यसुखाची आर्त हाक श्री बाबांना सतत बैचेन करीत असे. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीपासून प्रखर देशाभिमानाच्या जाणीवेमुळेच श्री बाबांनी भावंडांना शिवणकाम शिकवून आपला धंदा त्यांच्या हाती सोपविला आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.128 खेड्यांमधील तरूणांना एकत्र आणून श्री बाबांनी सेवादलाची स्थापना केली.
श्री बाबा पिढ्यान् पिढ्या चालत आलेली पठाणी पध्दत मोडून काढणारे महाराष्ट्रातील कर्मवीर क्रांतिकारी होते. महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा असलेल्या श्री बाबांंच्या कार्याचे कौतुक पंडित नेहरूंनी केले होते. क्रांतिवीर नाना पाटलांनी श्री बाबांना ‘त्यागी गणोरे’ ही पदवी बहाल केली होती. जुलमी इंग्रजाच्या अटकसत्रामुळे देश स्वातंत्र्य होईपर्यत ते भुमिगत राहिले.
देश स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार राजकारणाकडे पाठ फिरवून श्री बाबांंनी पुन्हा आपला शिवणकामाचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. ते नाशिकमधून बाहेर पडले व त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घेतला. पुण्यात सुरूवातीला नोकरी मिळत नसल्याने आत्महत्येचा विचारही त्यांच्या मनात डोकावला होता. अखेर सात महिन्यांच्या खडतर कष्टानंतर कर्वे रोडवरील रसशाळेसमोर कचरे वाडीत दीड खणी जागेत दुकान व वरती पोटमाळ्यावर बाबांनी पुन्हा संसार मांडला. कचरेवाडीतील दुकानात श्री बाबांचे भाग्य उजाळले.
पुण्यात आल्यापासून ईश्वरी सामर्थ्याचे अनुभव श्री गणोरेबाबांना सतत येत होते. दुकानात शर्ट शिवण्यास आलेल्या अभ्यंकर नावाच्या गृहस्थाने त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना ज्ञानेश्वरी वाचण्यास दिली. ज्ञानेश्वरीच्या वाचन साधनेपासून श्री बाबांच्या आध्यात्मिक तपस्येची मुहूर्तमेढ झाली. अंध वृध्दाच्या उपदेशातून श्री बाबांनी पंढरीची वारीही सुरू केली. पुढे 6 डिसेंबर 1952 रोजी धुळे येथील अ. ल. भागवत यांच्याशी श्री बाबांची गाठ पडली. तेव्हा भागवत यांनी श्री बाबांना ज्ञानदेवांच्या पंथाचीच, म्हणजेच नाथपंथाची दीक्षा दिली व गोरक्षनाथाचा जप करण्यास सांगितले.
गोरक्षनाथांचा जप दररोज बारा हजार या प्रमाणे दोन वर्षे केला. गोरक्षनाथांनी श्री बाबांना दर्शन दिले. यानंतर हरिनामाचा जप त्यांनी सातत्याने दोन वर्षे करून अनुभव घेतला. रामनामाचाही जप त्यांनी सलग दोन वर्षे करून सिध्द केला. गोरक्षनाथांचा जप दोन वर्षे केल्याने श्री गणोरेबाबांना सिद्धी प्राप्त झाली. त्यांनी या सिद्धीचे यशस्वी प्रयोगही केले. मात्र, ते वेळीच सावध झाले. त्यांनी विचार केला, की आपण असे चमत्कार केले, तर दुनिया आपल्याला डोक्यावर घेऊन नाचेल. त्यातून अहंकार व लोभ निर्माण होईल. पण, आपणास देव भेटणार नाही, ईश्वरप्राप्ती होणार नाही. मग निश्चय करून श्री बाबांनी हातात पाणी घेऊन संकल्प केला, की मी माझ्या सामर्थ्याचा उपयोग स्वार्थासाठी, मोठेपणाकरिता कधीही करणार नाही. कोणालाही चमत्कार दाखविणार नाही.
संसार करता करता तुकाराम महाराज विठ्ठलरूप झाले होते. श्री बाबांनी संसार करीत असताना आपला परमार्थ आदर्शरूप केला होता. 1956 मध्ये संतशिरोमणी तुकाराममहाराजांनी माघ शुद्ध दशमीच्या दिनी श्री गणोरेबाबांना स्वप्नात मंत्र दिला. हा मंत्र श्री बाबांनी 12 वर्षे जपला. या नामसाधनेच्या तपातूनच संत गणोरेबाबांचा जन्म झाला. जगत्गुरू संत तुकाराममहाराज, ज्ञानेश्वर माऊली या संतसूर्य मालिकेतील संत गणोरे बाबा एक थोर विभूती होते.
सत्संग, नाम जप, ध्यान, ईश्वरचिंतन हेच एकमेव श्री बाबांचे ध्येयपूर्तीत साधनेच्या चैतन्यमय मार्गात अनेक सत्पुरुष श्री गणोरेबाबांना भेटले. स्वामी गगनगिरीनाथ, आचार्य आनंद, महान सत्पुरुष सावळा हरी, साधू ओंकारेश्वर, लासलगावाचे भगरीबाबा, अमरानंद, नित्यानंद, मेहेरबाबा, संत गाडगेबाबा, साधू वासवानी, वेदाचार्य मंगलमूर्ती, रमणमहर्षी, अनंतमहाराज, पुंडलिकमहाराज या विभूतींच्या गाठीभेटींत श्री बाबांना त्यांचे आशीर्वाद लाभले. या आशीर्वादाने त्यांच्या साधनेला गती मिळत गेली होती. 1958 च्या फेब्रुवारी महिन्यात स्वामी अमरानंद यांच्या उपदेशातून श्री बाबांनी संन्यास घेण्याचा मनोमनी निर्धार केला होता. संन्यास घेण्याचा त्यांचा संकल्प भगरीबाबांच्या उपदेशामुळे पूर्णत्वाकडे जाऊ शकला नाही. श्री गणोरेबाबांनी जप, तप, ध्यानधारणा करीत असताना तीर्थक्षेत्री जाऊन आपली साधना अखंडपणे सुरू ठेवली होती. देहू, आळंदी, पंढरपुरी क्षेत्री आत्मानंद गवसणार्या श्री बाबांना हरिद्वार दर्शनातही साधू-संतांच्या आशीर्वादाची फलप्राप्ती होत राहिली.
तुकोबारायाच्या साक्षात्काराने मार्च 1968 मध्ये श्री बाबांना मुळशी तालुक्यातील भुकुम गावात हरिराम आश्रय मठ स्थापन केला. मठ स्थापनेनंतर बाबांच्या नामसाधन मार्गदर्शनाचा अखंड निर्मळ झरा उगम पावला. प्रेमळ उपदेशाने बाबांनी हजारो माणसांना आध्यात्मिक जीवनामृत दिले. ॐ काराचे तत्वज्ञान जगापुढे मांडण्यासाठी मठातच श्री बाबांना ‘ॐ हा गुरू’ हा प्रासादिक वाणीतून ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथदारे श्री महाराजांचे तत्त्वज्ञान महाराष्ट्रात घरोघरी पोहचून त्यांची कीर्ती सर्वत्र दुमदुमली आणि प्रेमयोगी श्री बाबांना भक्तांनी प्रेमनिधी पदी रूढ केले.
उरलो आता परोपकाराकरीता ही संत तुकारामांची शिकवण देत कॅन्सरच्या आजाराशी झगडत असतानाही त्यांनी शेवटपर्यंत नामाचे महिमात गायला. अखेर मंगळवार, 7 नोव्हेंबर 1978 रोजी संत गणोरेबाबा समाधिस्थ झाले. श्री बाबांनी देह ठेवला खरा, पण मठावर श्री महाराज गेल्यासारखे वाटतच नाही. आजही सारे वातावरण चैतन्यमय आहे. जणू काही श्री बाबांनी स्वत:च्या दिव्य आत्माच्या तेजाने मठाच्या परिसरातील अणू-रेणू उजळून टाकला आहे.
Share