पुणे
Trending

गजा मारणेची ९ किलोमीटर धिंड काढणारे पुण्याचे ACP जाधव सेवानिवृत्त, मुळशीतही कोरोना काळात राहिले होते सतर्क

महावार्ता न्यूज ः गजा मारणेची ९ किलोमीटर धिंड काढणारे , दाभोळकर आणि पानसरे खून प्रकरणातील तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी ३४ वर्षांच्या कार्यकाळात अनेक प्रकरणं हाताळली आहेत. बापू बिरु वाटेगावकर, गजा मारणे, बाप्या नायर, फरासखाना पोलीस ठाणे येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात त्यांनी तपास अधिकारी म्हणून काम केलं आहे. श्रीधर जाधव यांना एकूण ३०० पेक्षा अधिक बक्षिसे मिळाली आहेत. मंगळवारी (३० नोव्हेंबर) ते सेवानिवृत्त झाले. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप दिला.
सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी मुंबई घाटकोपर येथील चिरागनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या पदापासून नोकरीस सुरुवात केली. जाधव यांनी ३४ वर्षांच्या काळात अनेक चढउतार पाहिले. त्यांनी निवृत्त होताना यापैकीच काही आठवणींना उजाळाही दिला.
ते म्हणाले, “१९९१-९२ मध्ये मोबाईल नव्हते. त्यामुळं गुन्हेगारांना पकडने फार आव्हानात्मक असायचे. तेव्हा, बापू बिरु वाटेगावकर यांना सोडवण्यासाठी काही जणांनी पोलिसांवर गोळीबार केला आणि कस्टडीत असलेल्या वाटेगावकर यांना पळवून नेले होते. तेव्हा मी आणि माझ्या इतर सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. दरम्यान, ते कमांडर मोटारीतून पळून गेले होते. त्या मोटारीचा उजवा इंडिकेटर सुरू होता त्यावरून सर्वांचा शोध घेतला. अवघ्या २४ तासात ११ जणांना ताब्यात घेतलं होतं. अस जाधव यांनी सांगितलं.
पुढे श्रीधर जाधव म्हणाले, “गजा मारणे याच्या तपासात कोणते अधिकारी धजावत नव्हते. त्याची दहशत होती. तेव्हा, ९ किलोमीटर बेड्या घालून त्याची धिंड काढली होती. आरोपींना आरोपीसारखं ट्रीट केलं पाहिजे.” “कोल्हापूर जिल्हा आणि पुणे ग्रामीण येथे काम करत असताना खूप छान अनुभव आले. तेथील नागरिकांनी खूप सहकार्य केलं. चांगले अधिकारी देखील मिळत गेले,” असंही जाधव यांनी नमूद केलं.

मुळशीतील हिंजवडी पोलिस स्टेशन श्रीधर जाधव यांच्या कक्षेत होते. कोरोना काळात हिंजवडी पोलिस स्टेशनचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरिक्षक कोरोना सुरक्षापेक्षा जमीन व्यवहारात मग्न होते. महावार्ताने याकडे लक्ष दिले असता जाधव यांनी संबंधित अधिकार्‍यांला समज देऊन कोरोना मुक्त मुळशीसाठी काम करण्यास सुनवले होते.

सेवानिवृत्त झाल्यानंतर श्रीधर जाधव यांनी पाठवलेला संदेश

सप्रेम जय हिंद
सरकारी नोकरी मधील शिरस्त्याप्रमाणे मी पोलीस खात्यातील माझ्या 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होतोय.
मी पोलीस खात्यातील माझ्या सेवेच्या वाटचालीत ‘” एकच तारा समोर आणि पायतळी अंगार “‘ ह्या पी.टी.सी. मधील चौथऱ्यावर कोरलेल्या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी पासून सुरुवातीस प्रेरणा घेऊन पुढील कालावधीत ” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य प्रमाण मानून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावले आहे.
माझा हा पोलिस खात्यातील खडतर प्रवास ज्यांच्यामुळे सुखकर होऊन मी तो यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो अशा सर्व वरिष्ठ अधिकारी, बॅचमेट , सर्व कनिष्ठ अधिकारी, सर्व अमलदार यांचे हार्दिक आभार व धन्यवाद व्यक्त करतो. पोलीस खात्यामध्ये कायद्याच्या व शिस्तीच्या अंमलबजावणीच्या सद्हेतूने काम करत असताना कळत नकळत काहीजण दुखावले गेले असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
आपण सर्वांनी माझ्या पोलिस खात्यातील सेवे दरम्यान जे मार्गदर्शन केले, जे सहकार्य केले त्याचे ऋण केवळ आभार मानून किंवा धन्यवाद देऊन फिटणार नाही हे मला ठाऊक आहे म्हणून मी कायम आपल्या ऋणात राहू इच्छितो.
शेवटी एवढेच सांगू इच्छितो,

आज निवृत्तीच्या उंबरठ्यावर
डोळे भरून येतात……
उरतात फक्त आठवणी
वर्ष सरून जातात …….
आम्ही जातो आमच्या गावा | आमचा राम राम घ्यावा ||
जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय भारत !

श्रीधर जाधव
सहाय्यक पोलीस आयुक्त
वाकड विभाग पिंपरी चिंचवड
आयुक्तालय

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close