खेळ खेळाडू
Trending
मुळशीत खाशाबा जाधव पुरस्काराने हर्षवर्धन सदगीरचा गौरव, पेरिविंकल स्कूलमध्ये महाराष्ट्र क्रीडा दिनाने खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती साजरी

खाशााबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा गौरव करताना डावीकडून संजय दुधाणे, राजेंद्र बांदल, श्यामकांत शेंडे, शांताराम जाधव व रविंद्र शिंदे.
बावधनः पेरिविंकल स्कूल व धु्रवतारा फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या 97 वी जयंती पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. या निमित्ताने तिसर्या खाशााबा जाधव पुरस्काराने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरचा गौरव करण्यात करण्यात आला.
15 जानेवारी हा भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांना अभिनव गु्रपचे संचालक श्यामकांत शेंडे व विधीतज्ञ रविंद्र शिंदे यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पेरिविंकल स्कूलचे संस्थापक राजेंद्र बांदल, अर्जून पुरस्कर प्राप्त कबड्डीपटू शांताराम जाधव व क्रीडालेखक संजय दुधाणे, पेरिविंकल स्कूलच्या संचालिका रेखा बांदल, अॅड. जगदिश बेंडखळे, अजित इंगवले, योगेश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. मानचिन्ह, शाल, श्रीफळ, क्रीडापुस्तके व पंधरा हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यापूर्वी ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे, महाराष्ट्र केसरी बालारफिक शेख यांचा खाशाबा जाधव पुरस्कारान गौरव करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर खाशाबांच्या ऑलिम्पिक आठवणींना राजेंद्र बांदल व क्रीडालेखक संजय दुधाणे यांनी उजाळा दिला. प्रति खाशाबा जाधव महाराष्ट्रात निर्माण होण्यासाठी त्याचा जन्मदिन हा राज्य क्रीडा दिन असल्याचे सांगून बांदल पुढे म्हणाल की, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुस्ती खेळात खाशाबांनी ऑलिम्पिक गाजवले होते. आता हर्षवर्धन सदगीरसारखे मल्लांना सुविधा मिळत असल्याने ऑलिम्पिकचे पदक पटकावले पाहिजे. याप्रसंगी कबड्डीपटू राजेश जानकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

खाशाबा जाधव यांच्या चरित्राचे लेखक संजय दुधाणे यांचे खाशाबा आणि आजचे क्रीडाक्षेत्र या विषयावरील व्याख्यानाला उपस्थितांनी दाद दिली. दुधाणे यांनी कराड ते हेलसिंकी ही खाशाबांनी यशोगाथा चित्रपटासारखी सांगून ऑलिम्पिकमय वातावरण निर्माण केले होते. खाशाबांनी जिंकलेल्या 1952 च्या ऑलिम्पिक पदकानंतर महाराष्ट्रात ऑलिम्पिक विजेता घडला नाही ही खंत व्यक्त करीत दुधाणे म्हणाले की, खाशाबांकडून प्रेरणा घेऊनच महाराष्ट्राच्या मातीत ऑलिम्पिक पदकाची फुले उमलतील.

विधीतज्ञ रविंद्र शिंदे यांनी आपल्या भाषणात क्रीडादिनाच्या कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले. अर्जून पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांनी क्रिकेटनंतर कबड्डीला चांगले दिवस आल्याचे नमूद केले. सत्काराला उत्तर देताना महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी आपला जीवनपट उलगडून दाखविला. सेनादलाची नोकरी सोडल्यानंतर कारकिर्दीला कशी दिशा मिळत गेली हे सदगीरने सांगून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती काशिद यांनी केले तर आभार विनोद माझिरे यांनी मानले.
व्हिडिओ न्यूज पहाण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/F6nVfI7vg_Y
संपूर्ण लाईव्ह Live कार्यक्रम पहाण्यासाठी क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇
https://m.facebook.com/story.php?story_fbid=901979210336223&id=100000903856269
Share