खेळ खेळाडू
मुळशीच्या सुवर्णकन्येची समुद्रभरारी… गीता मालुसरेकडून प्रॅांग्स लाईट हाऊस ते बेलापूर जेट्टी हे ३२ किलोमिटर अंतर ६.३० मिनिटात पूर्ण

महावार्ता न्यूज ः भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात महिला सबलीकरणाचा संदेश देण्यासाठी कुमारी गीता महेश मालुसरे हिने प्रॅांग्स लाईट हाऊस ते बेलापूर जेट्टी हे ३२ किलोमिटर अंतर ६.३० मिनिटात मोहीम आज पूर्ण केली.
गीताने सकाळी ८ वाजता कुलाबा प्रॅांग्स लाईट हाऊस जवळ समुद्रात उडी घेतली आणि पोहायला सुरूवात केली . दुपारी २.३० वाजता बेलापूर जेट्टी जवळ ३२ किलोमिटर अंतर ६.३० मिनिटात गीताने पोहून पार केले. ढगाळ वातावरणात समुद्रात उसळत असलेल्या लाटांना गीता धाडसाने सामोरी गेली आणि ही मोहीम यशस्वी करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला “सशक्त महिला ,सशक्त भारत “हा संदेश गीताने समस्त देशवासीयांना दिला आहे. भारतातील मुली याही क्षेत्रात सक्षम आहेत हे गीताने या मोहीमेतून देशवासीयांसमोर ठेवले आहे.
२०१७ साली गीताने तिच्या १३व्या वाढदिवसाला मुंबईच्या याच समुद्रात ३२ किलोमिटर अंतर पोहून पूर्ण केले होते. कोरोनामुळे गेले दोन वर्ष गीताचा पोहण्याचा सराव पुर्ण बंद होता. गेल्या दोन महिन्यात पुन्हा कसून सराव करत गीताने आज ३२ किलोमिटरची समुद्रभरारी घेतली आणि आपल्या भविष्यातील उद्दिष्टपूर्ततेसाठी आपण सज्ज आहोत हे दाखवून दिले आहे. या पूर्वी गीताने महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध स्पर्धेमधे यश संपादन केले आहे.
गीता फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेतून बारावीचे शिक्षण घेत आहे. गीताची सध्या बारावीची बोर्डाची परिक्षा सुरू आहे. आजची ही मोहीम पुर्वनियोजित होती आणि योगायोगाने बारावीच्या दोन पेपरमधे बारा दिवसांची गॅप मिळाली त्यामुळे गीताने ही मोहीम पुर्ण करण्याचे ठरविले आणि ती आज यशस्वी देखील केली आहे.
राष्ट्रीय कोच शेखर खासनीस यांनी आजच्या या मोहीमेसाठी गीताला मार्गदर्शन करत तिची तयारी करून घेतली होती .आज त्यांनी स्वत: या मोहीमेत सहभागी होऊन गीताला प्रोत्साहन दिले .त्याबरोबर हर्षद इनामदार हे प्रशिक्षकदेखील सहभागी झाले होते. तनिष कुडले या सहकारयाने काही वेळ गीताला प्रोत्साहन देण्यासाठी स्वीमिंग केले. स्विमींग फेडरेशन अॅाफ इंडीयाच्या मान्यतेने स्वीमिंग असोसीएशन अॅाफ महाराष्ट्रचे निलेश मकवाना यांनी या मोहिमेचे परिक्षक म्हणून काम पाहिले .
या मोहिमेत गीताची आज्जी शैला मालुसरे , गीताचे वडील महेश मालुसरे आणि आई दिपा मालुसरे उपस्थित होते. माधव ढोक बरोबर कुमारी तनिष्का, राजनंदिनी, ओम ,देव हे बालचमू गीताला मोहिमेसाठी प्रोत्साहन देत होते. परिस्थिती कितीही अवघड असली तरी कष्टाने या कठीण परिस्थितीवर मात करत यश मिळवता येते हे आज गीताने दाखवून दिले आहे. शार्क अॅक्वाटीक क्लब या संस्थेने या मोहिमेचे आयोजन केले होते तर सह्याद्री प्रतिष्ठान मुळशी आणि वेस्टर्न घाट रनिंग फाऊंडेशन यांनी या मोहिमेला सहकार्य केले आहे.
Share