माय मुळशी
Trending

मुळशीत राज्यातील पहिली ‘ई-कुबेर’ प्रणाली, अजित पवारांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

महावार्ता न्यूज:  रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकांसाठी विकसित केलेल्या ‘ई-कुबेर’ प्रणालीच्या वापरानं कोषागारांचं कामकाज जलद, सुलभ, सुरक्षित, विश्वासार्ह होणार असून ‘ई-कुबेर’ प्रणाली भविष्यात राज्यातील सर्व कोषागारे व उपकोषागारांमध्ये कार्यान्वीत करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.

मुळशी (जि. पुणे) उपकोषागार कार्यालयातील ‘ई-कुबेर’ या रियल टाईम व्हाऊचर जनरेशन प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीनं केलं. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य व केंद्र शासन, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक उपक्रमांना वित्तीय सेवा देणारी सुरक्षित व सर्वसमावेशक प्रणाली म्हणून ‘ई-कुबेर’ प्रणालीची ओळख आहे. वापरायला सहज, सुरक्षित असणाऱ्या या प्रणालीमुळे कोषागार कार्यालयांच्या कामकाजाचा वेग वाढणार आहे. ‘ई-कुबेर’ प्रणालीमुळे ‘चेक’ क्लिअरींग तसंच प्रदानाचा कालावधी कमी होईल. शासकीय निधी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या बँक खात्यात पडून राहणार नाही. कोषागार कार्यालयामसाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रणालीचं प्रशिक्षण कोषागार कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घ्यावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन झालेल्या या कार्यक्रमाला मंत्रालयातून लेखा व कोषागार संचालनालयाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, लेखा व कोषागार संचालक वैभव राजेघाटगे, ‘एनआयसी’चे वरिष्ठ वैज्ञानिक बाळकृष्ण नायर, लेखा व कोषागार सहसंचालक स्वप्नजा सिंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. व्हीसीद्वारे ‘एनआयसी’चे प्रमुख एस. पी. कुलश्रेष्ठ, सहसंचालक शुभांगी पाटोळे, ‘एनआयसी’चे वरिष्ठ वैज्ञानिक विशाल नळदुर्गकर, पुण्याचे वरिष्ठ कोषागर अधिकारी शेखर शेट्टे, मुळशीचे उपकोषागार अधिकारी चंद्रशेखर निसाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव राजेघाडगे यांनी केले. तर आभार स्वप्नजा सिंदकर यांनी मानले.
०००००

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close