
पंजाबमधील अमृतसर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ जिम्नॉस्टिक्स स्पर्धेत मुळशीतील हिंजवडीमधील गणेश सोमनाथ नवलेने सलग दुसर्या वर्षी पदकाची कमाई केली आहे.
राष्ट्रीय खेळाडू गणेश नवलेने अवघड समजल्या जाणार्या वॉल्ट या प्रकारात 125 गुणांची कमाई करून पुणे विद्यापीठाचा यशाचा झेंडा सलग दुसर्यांदा फडकविला. या कामगिरीमुळे चीन येथे होणार्या जागतिक आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी नवले पात्र ठरला आहे.
पंजाबमधील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत देशातील 58 विद्यापीठे सहभागी झाली होती. यात पुणे विद्यापीठाचे आव्हान गणेशमुळे कायम राखले आहे. पुणे विद्यापीठाच्या 7 पुरूष खेळाडूपैकी एकमेव गणेशने पदक जिंकले आहे. अमृतसरच्या कृष्णाकुमार व रिदम शर्माला अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक मिळाले आहे.
गणेश पुणे येथील शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू असून आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रविण ढगे त्याला मार्गदर्शन करीत असतात. तो ग्रामविकास अधिकारी सोमनाथ नवले यांचा मुलगा असून स्पर्धेपूर्वी दिल्ली येथे त्याने कसून सराव केला होता.
Share