महाराष्ट्र
Trending

मुळशी सत्याग्रहाला १०१ वर्षे पूर्ण, माले गावातील सेनापती बापट स्मारकाजवळ शालेय विद्यार्थ्यांची स्मरणांजली

महावार्ता न्यूज ः मुळशी सत्याग्रहाला १०१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुळशी धरणाजवळील सेनापती बापट स्मारकाजवळ मुळशी सत्याग्रहाच्या लढ्यात आपलं सर्वस्व अर्पण केलेल्या योद्ध्यांचे स्मरण करण्यात आले. यावेळी मुळशी धरणग्रस्त मंडळाचे अध्यक्ष आणि ज्यांचे देळवली हे गावच या भारताच्या नकाशावरून कायमचे गायब झाले आहे ते देळवली गावचे धरणग्रस्त गणपतमामा वाशिवले,  देशभक्त केशवराव जेधे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिग्विजय जेधे, पर्यावरण अभ्यासक जिंदा सांडभोर, अॅड राजेश सातपुते, मंदार मते, ग्रा. सदस्य अनिल मापारी, मा सरपंच हनुमंत सुर्वे, तेजस पवार, संतोष आधवडे, हनुमंत ठकोरे, गणपत तिडके, मुख्याध्यापक प्रक्षाळे, राजेंद्र पळसकर जाधव सर, अनंता बांदल , गोरे , माने आणि सेनापती बापट शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
१९२१ साली मुळशी धरणात जमिनी बुडाल्यावर तेंव्हापासून डोंगरात शेतकऱ्यानी घरे बांधली होती. ते रहात असलेले घर आपल्या नावावर करावे व सरकारी गावठाण मिळावे यासाठी पारतंत्र्यात इंग्रज सरकारकडे व स्वातंत्र्यानंतर लोकशीहीतील सर्व सरकारांकडे मुळशी धरणग्रस्त मागणी करत आहेत. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना आजही मुळशी धरणग्रस्त स्वातंत्र्यातील पारतंत्र्य अनुभवत आहेत आणि न्यायासाठी दारोदार फिरत आहेत.
मुळशी धरणभागातील लोकांना घर आणि गाव मिळेपर्यंत १०१ वर्षे सुरू असलेला मुळशी धरणग्रस्त लढा आम्ही सुरू ठेऊ असा निर्धार मुळशी धरणविभाग विकास मंडळांचे अध्यक्ष गणपत वाशिवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. या साठी सर्व मुळशी धरणग्रस्तांनी एकजुटीने प्रयत्न करण्यासाठी एकत्र यावे हे आवाहन आज केले .
मुळशी सत्याग्रह पुस्तक नव्याने करणार प्रकाशित
मुळशी सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त मुळशी सत्याग्रहाचे मुख्य प्रवर्तक विनायक भुस्कूटे यांनी तुरूंगात असताना लिहिलेले मुळशी सत्याग्रह हे पुस्तक सह्याद्रीचा प्रतिष्ठान मुळशीच्या वतीने आम्ही १ मे २०२२ रोजी पुर्नप्रकाशीत करणार आहे. विनायक भुस्कुटे लिखीत मुळशी सत्याग्रह हे पुस्तक म्हणजे मुळशी धरणग्रस्त शेतकरयांसाठी गीता आणि गाथेसमान आहे म्हणून हे पुस्तक मुळशी धरण भागातील ५२ गावच्या प्रत्येक घरात पोहचविण्याचा संकल्प आज आम्ही केला आहे . मुळशी सत्याग्रहाचा आणि या भागाचा संपूर्ण इतिहास मुळशीतील प्रत्येक व्यक्तीला कळावा व त्यातून प्रेरणा घेऊन आगामी काळात योग्य सनदशीर मार्गाने न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करत रहावे हा या पुस्तक पुर्नप्रकाशनामागचा मुळशी सत्याग्रह शताब्दी वर्षातील हेतू आहे

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close