पुणे
Trending

मुळशीतील सर्वात मोठ्या हिंजवडीमधील म्हातोबा देवाच्या उत्सवाला बगाड मिरवणुकीने सुरूवात,  लोटला अथांग जनसागर, इतिहासात पहिल्यांदा भाविकांची उच्चांकी गर्दी  

महावार्ता न्यूज:  हिंजवडी वाकडकरासंह  जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हिंजवडीतील  म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्ताने काढलेल्या पारंपारिक बगाड मिरवणुकीला यंदा अथांग जनसागर लोटला.
हिंजवडी च्या इतिहासात पहिल्यांदा यावर्षी भाविकांनी तोबा गर्दी झाली होती. पुढील पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे बगाड मिरवणूक हे खास आकर्षण असते. ही मिरवणूक व दैदिप्यमान सोहळा अनुभवण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातुन वीस ते पंचवीस हजाराहून अधिक भाविक हिंजवडीला येतात. यावेळी म्हातोबाच्या नावानं चांगभलं … पैस..पैसचा जयघोष व चांगभलं बोला चांगभलं… च्या नाऱ्याने अवघी आयटीपंढरी दुमदुमली होती.
तत्पूर्वी  शनिवारी (दि. 16)सायंकाळी पाच वाजता साखरे पाटील घराण्यातील किसन साखरे पाटील यांनी गळकऱ्याच्या निवडीची घोषणा केली. जांभूळकर घराण्यातील रामदास शिवाजी जांभुळकर या तरुणाला यंदाचा गळकरी होण्याचा मान मिळाला. तर दीपक दामू साखरे व  संदेश गुलाब साखरे यांना खांदेकऱ्याचा बहुमान मिळाला. हुलावळे परिवारातील श्रीरंग हुलावळे यांना काठीचा मान मिळाला.
पैस… पैसचा जयघोष करत वाजत्र्यांच्या सनई चौघाड्याच्या निनादात गळकऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात आणण्यात आले. यावेळी त्यास स्नान घालण्यास जमलेल्या महिलांनी गर्दी केली. गळकऱ्याची विधीवत पूजा केल्यानंतर जमलेल्या गावकऱ्यांना हळदी कुंकवाचे लेपण लावण्यास सुरूवात केली.
  सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळऱ्याला गावठाणातील म्हातोबा मंदिरात अभ्यंग स्नान घालून वाजत गाजत होळी पायथ्याजवळ  आणण्यात आले. गावठाणातील म्हातोबा व मारुतीरायाचे दर्शन घेऊन गळकऱ्याला होळी पायथ्याला आणल्यानंतर संदीप साखरे व सुतार समाजातील पांडुरंग सुतार यांनी गळकऱ्याला गळ टोचला.
    यावेळी हातातील काठी उंचावून होणारा काठी नाद तसेच पैस… पैस.. व म्हतोबाच्या नावान चांगभल चा जयघोषाने अवघी आयटीनगरी दुमदुमली होती.गळकरी व खांदे कऱ्यांचे पाय धुण्यासाठी व त्यांना पाणी पाजण्यासाठी पाण्याच्या घागरी घेऊन महिला गर्दीतुन वाट काढत होत्या.बगाड रिंगण मैदानात गळकरी रामदासला आणल्यानंतर बगडावर बसवून हजारो भाविकांच्या साक्षीने गोल रिंगण घालून त्यास गोलाकार फिरवण्यात आले. यानंतर हजारो भाविकांच्या जयघोषात या  मिरवणूकीचे  वाकडच्या दिशेने प्रस्थान झाले.
खिल्लारी बैलजोड्या  जुंपण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चुरस
हिंजवडी वाकड मध्ये शहरीकरण झाले असले तरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी आवड म्हणून घरी खिल्लारी बैल पाळले आहेत. यातील काहीजण बैलगाडा शर्यतीत तर काहीजण पंढरपूर च्या पायी वारीतील रथाला आपल्या बैलजोड्या जुंपतात. सजवलेल्या बैलजोड्या या बगाड मिरवणूक रथाला जोडण्यासाठी जीवन जांभुळकर, मनोज साखरे, तसेच माणचे वसंत बोडके यांच्यासह अनेकांच्या बैलजोड्या मिरवणूक रथापुढे दाखल झाल्या होत्या.
आयटीयन्सचा चा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद
या पारंपरिक सोहळ्यात स्थानिक भविकासोबत यंदा आयटी अभियंते मोठ्या हिरारीने व स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. त्याच्या मुखातून होणारा म्हातोबा चा जयघोष लक्ष वेधनारा होता.  त्यामुळे आयटीयन्सनाही या उत्सवाची चांगलीच भुरळ पडली असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.  सेल्फी व गर्दीचे चित्रण काढण्यात आयटीयन्स मग्न होते.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close