
महावार्ता न्यूज: लवळे (ता.मुळशी) येथील ग्राम दैवत रोटमलनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या वार्षिक संगीत उत्सवात किराणा घराण्याचे प्रतिभावंत गायक पं. यादवराज फड यांनी नाविन्यपूर्ण रचना सादर करून रंग भरले. फड यांनी सुरवातीला देस रागातील वचन ऐका कमलापती या अभंगाने सुरवात केली. जौनपूरी रागावर आधारित वैकुंठ पंढरी भीवरेचे तीरी, बिलासखानी तोडी सगुण संपन्न पंढरीच्या राया आदी रचना भावपूर्ण आलाप, सुरेल तानांनी आणि दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. रामका गुण गान करीए व बुंदसे भिगी मोरी सारी या हिंदी रचना ठुमरी अंगाने सादर केल्या. गौळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा ही संगीतरत्न मारोतराव दोंदेकरांनी गायलेली गौळण त्यांनी अप्रतिम ढंगात सादर करून दोंदेकरांच्या आठवणी जागवल्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफिलीची सांगता धुमाळी ठेक्यातील कृपाळू सज्जन तुम्ही संतजन या भैरवीतील रचनेने झाली. त्यांना तबल्यावर अविनाश पाटील , हार्मोनियमवर माधव लिमये , मृदंग किरण भोईर यांनी दर्जेदार साथसंगत केली.
फोटो – येथील संगीत उत्सवात सादरीकरण करताना पं. यादवराज फड.
————
Share