पुणे
Trending

इंडो शटल कामगार ते यशस्वी उद्योजक-यशस्वी काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे , वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय गंगाराम मातेरे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

१९९० ला विद्यार्थी काँग्रेसचा चिटणीस होऊन मी माझी राजकीय वाटचाल सुरु केली होती. १९९७ ला घोटवडे विकास सोसायटीचा चेअरमन झालो आणि मुळशी तालुक्यातील विकास सोसायट्यांच्या सहकारी देखरेख संघावर संचालक झालो .. काँग्रेस आणि सहकाराच्या माध्यमातून अशा प्रकारे मुळशी तालुक्याच्या राजकारणात मी सक्रीय झालो होतो.. काँग्रेस संघटना बांधणीसाठी मी प्रयत्नशील होतो .. तेव्हा कार्यकर्त्यांचा शोध घेताना आणि संघटना बांधणी करताना मला गवसलेला मौल्यवान हिरा म्हणजे गंगाराम मातेरे.. तेव्हा कोणी कल्पनाही केली नसेल, मी ही केली नव्हती, की मातेरेवाडीतील हा छोटासा कार्यकर्ता, जो एका कारखान्यात कामगार म्हणून काम करतोय, ज्याला राजकारणाची कसलीही पार्श्वभूमी नाहीये, तो काँग्रेस कार्यकर्ता एवढी मोठी गरुड भरारी घेईल.. आपल्या कर्तृत्वाने मुळशी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होईल… परंतु जेव्हा कर्तृत्व आणि नशीब ह्याची सांगड जुळते तेव्हा परमेश्वराला यश पदरात टाकावेच लागते .. अहोरात्र केलेल्या मेहनतीने पद, प्रतिष्ठा चालून पायाशी येते.

हे एका रात्रीत हे घडले का ? तर मुळीच नाही .. दोन तपांची दीर्घ तपश्चर्या ह्या यशामागे आहे .. कदाचित आजच्या युवा पिढीला माहीत नसेल की एका कारखान्यात नोकरी करुन, ती सुद्धा शिफ्टमध्ये, दूध पिशव्यांचे वितरण करत, पतसंस्थेचे डेली कलेक्शन करत ते राजकारणात सक्रिय झाले होते .. आज ते एक यशस्वी उद्योजक व यशस्वी काँग्रेस अध्यक्ष आहेत .. त्यांचा हा नेत्रदिपक प्रवास संघर्षमय आहे .. कधी कधी त्यांनी एकट्याने कोप-यात ढाळलेले अश्रु त्या प्रवासात असतील, तर कधीकधी सहका-यांबरोबर साजरा केलेला आनंद असेल .. विश्वास बसणार नाही असा हा रोमांचकारी संघर्षमय प्रवास आहे .. हे स्वप्नवत वाटत असले तरी एक वास्तव आहे .. एक सत्य आहे ..
१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली तेव्हा तालुक्यातील झाडून सारे कार्यकर्ते, नेते त्या पक्षात गेले. काँग्रेसचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, संघर्षमय इतिहास, देशासाठी काँग्रेसच्या नेत्यांचे बलिदान, विविध जाती धर्मांना जोडणारी विचारधारा, समाजाच्या अंतिम घटकापर्यंत विकासासाठी कायम प्रयत्नशील असणारा काँग्रेस पक्ष .. तो काँग्रेस पक्ष सोडण्याचा प्रश्नच नव्हता .. गंगाराम मातेरेंनी तेव्हा मला प्रश्न केला होता “भाऊ आपण काय करायचंय?” मी तेव्हा त्यांना उत्तरलो होतो “आपल्याला कुठंय त्यांच्याकडून (तालुका राष्ट्रवादीकडून) बोलावणं आलंय ?”. हे उत्तर जरी मी त्यांना तेव्हा दिले होते, तरी त्यावेळी फार मोठा दबाव माझ्यासह अनेक छोट्यामोठ्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी होता .. मी गेलो नाही म्हणून तेही त्यावेळी राष्ट्रवादीत गेले नाही .. नियतीने त्यांना काँग्रेसमध्ये ठेवले होते .. राष्ट्रवादीत जाऊ नये हा संकेत परमेश्वराने दिला होता .. आजचे यश मिळवण्यासाठी !

२००९ ला सुद्धा विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराच्या मागे गंगारामजी उभे राहिले होते .. काँग्रेस पक्षाच्या विरोधात बंडखोरी करणा-या उमेदवाराचे समर्थन न करण्याचा माझा सल्ला त्यांनी धूडकावला होता .. परंतु त्या निवडणूकी नंतर ते माघारी फिरले, काँग्रेस पक्ष सोडण्याची चूक करता करता ते थांबले .. काँग्रेस पासून दूर जाणा-या वाटेवरुन परत फिरले .. परमेश्वरानेच त्यांना त्या वाटेवरुन पुढे जाऊ दिले नाही .. त्यांना बोट धरुन परत आणले .. नियतीने त्यांना हा दुस-यांदा संकेत दिला काँग्रेसमध्ये राहण्याचा .. आजचे यश देण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षात टिकवून ठेवले ..
एखादा कार्यकर्ता घडताना तो जे निर्णय घेतो ते निर्णय घेताना पक्ष, सभोवतालच्या व्यक्ती, कार्यकर्ते, नेते ह्या सर्वांचा प्रभाव निर्णय घेणा-यावर राहातो. त्यानुसार तो निर्णय घेतो .. मग तो निर्णय बरोबर आहे हे साबीत करण्याची जबाबदारी निर्णय घेणा-याची राहाते .. गंगाराम मातेरेंनी आजवरच्या राजकीय प्रवासात जे निर्णय घेतले ते निर्णय बरोबर असल्याचे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने साबीत केले .. मिळालेल्या संधीचे आपल्या मेहनतीने चीज केले ..काँग्रेस मध्ये राहून कष्ट घेतले .. काँग्रेस संघटनेत युवक अध्यक्ष झाले ..आणि आज मुळशी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ..
ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली .. आता आगामी पंचायत समिती निवडणूकीत पंचायत समिती सदस्य होतील .. फक्त सदस्य नाही तर तालुक्याचे सभापती होतील अशी खात्री वाटते ..
१९९७ मला सापडलेला मोकळा ढाकळा गंगाराम आज राजकारणातला मुरब्बी एक्का आहे .. २००२ला मी लढवलेल्या पंचायत समिती निवडणुकीची प्रचार यंत्रणा सांभाळणारे गंगाराम मातेरे .. आज आमदार संग्रामदादांसाठी विधानसभा निवडणूक यंत्रणा सांभाळत आहेत .. हा दीर्घ अनुभव .. गाव, बुथची इत्थंभूत माहीती .. संग्रामदादांच्या फंडातून केलेली अनेक विकासकामे .. कोण अडवू शकणार आमच्या गंगाराम मातेरेंना पंचायत समितीच्या विजयापासून .. परमेश्वराचा संकेत नेहमीच त्यांच्या बाजूने आहे .. परमेश्वराचा आशिर्वाद नेहमीच त्यांच्या पाठीशी आहे ..
आपल्या वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आणि भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा !
अशोक मातेरे
मा. चेअरमन रोकडेश्वर विविध कार्यकारी सोसायटी घोटवडे.
मा. संचालक मुळशी तालुका देखरेख संघ.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close