
महावार्ता न्यूज ः मुळशी पंचायत समितीच्या आठ गणांची आरक्षण सोडत कार्यक्रम गुरुवारी (दि. २८) सकाळी ११ वाजता पौड येथे पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात पार पडणार असल्याचे मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी सांगितले.
मुळशी पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत पौड येथे होणार असून जिल्हा परिषदेच्या गटाचे आरक्षण पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात होणार आहे. मागील 13 जुलै ला ही आरक्षण सोडत होणार होती परंतु ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबीत असल्याने ऐनवेळेस ही सोडत रद्द करावी लागली होती. मुळशीत गेल्या पंचवार्षिक मध्ये सहा गण होते. परंतु काही गावे महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाली तर शहरालगत च्या काही गावांची मतदार संख्या वाढल्याने मुळशीत आता नव्याने दोन गण वाढले आहेत त्यामुळे एकूण गणांची संख्या आठ झाली आहे.
यापूर्वीच्या सहकार खात्यासह काही ग्रामपंचायत निवडणुका देखील ओबीसी आरक्षणाविना झाल्या होत्या.
मात्र नुकताच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना निवडणुकीत आरक्षण देण्यास हिरवा कंदील दाखवल्याने आगामी महानगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी समाजातील इच्छुकांना न्याय मिळणार आहे.
मुळशीतील इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी विशेषतः राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी संख्या आहे. विविध पक्षांच्या इच्छुकांनी समाजपयोगी विविध कार्यक्रम घेऊन लाखो रुपये खर्चही केले आहेत. एवढे करूनही आरक्षण दुसरे निघाले तर आपला खर्च वाया जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांत आरक्षणावरुन धाकधूक वाढली आहे. तर काहींनी मनासारखे आरक्षण पडण्यासाठी पुन्हा देव पाण्यात ठेवले आहेत.
या पंचवार्षिकमध्ये आपल्या मनासारखे आरक्षण निघावे यासाठी मुळशीतील काही इच्छुकांनी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन पंढरीच्या पांडुरंगाला साकडे घातले होते.तर काहीजण वेगवेगळ्या देवदेवतांना नवस बोलले आहेत तर काहींनी विविध बुवा भक्तांकडे (महाराजांकडे) जावून आपला गण, गट शाबूत राहावा यासाठी मन्नत मागितली आहे.
मुळशी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पूर्वी तीन गट होते तर पंचायत समिती सहा गण होते. आता जिल्हा परिषदचा एक गट वाढला असून पंचायत समितीचे देखील दोन गण वाढले आहेत. त्यामुळे मुळशीतील पंचायत समितीत आता आठ सदस्य निवडून जाणार आहेत.
मुळशीत वार्ड रचनेत पौड, कोळवन हा जिल्हा परिषद गट वगळता इतर सर्व गटांची नावे देखील बदलली आहेत. पूर्वीचा हिंजवडी, माण जिल्हा परिषद गट वार्ड रचनेत बदलला असून यंदा हिंजवडी गट वेगळा तर माण गटात वेगवेगळ्या गावांचा समावेश झाला आहे.
यंदाच्या स्थनिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षातील इच्छुकांनी यावेळी जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम राबवून लाखो रुपये देखील खर्च केले आहेत.
तालुक्यात मागील दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती. याहीवेळस पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहावे म्हणून नेते मंडळींची धडपड सुरू आहे. त्यानुसार पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. तर स्थानिक आमदारांनी विविध गावाना विकासनिधी दिल्याने विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यात काँग्रेसही आपली पाळेमुळे घट्ट रोवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे काँग्रेसला यंदा खाते खोलण्याची अपेक्षा असून काँग्रेसमध्ये देखील इच्छुकांची गर्दी वाढली आहे.
तालुक्यात शिवसेना व राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने या दोन्ही पक्षात देखील इच्छुकांची संख्या वाढली आहे. काही इच्छुकांनी गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटात सामाजिक काम, देवदर्शनासाठी सहली, कोकण व थंड हवेचे ठिकाण, शेतकऱ्यांचे प्रश्न, विविध आंदोलने, महिलांचे उपक्रम, शेतकरी सहली काढून लाखो रुपये खर्च केले आहेत तर काहींनी मतदारसंघ महिला आरक्षित झाल्यास पत्नीला उमेदवारी मिळविण्याची देखील तयारी करून ठेवली आहे.
त्यामुळे यंदा कुणाच्या नशिबात कसे आरक्षण पडणार, कुणाचा पत्ता कट होणार याची उत्सुकता तमाम मुळशीकरांना लागून राहिली आहे.
मुळशीतील आठ जागांपैकी एक जागा अनुसूचित जाती जमातीच्या महिलेसाठी राखीव होणार आहे. पण ती जागा नेमकी कोणत्या गणात आरक्षित होणार याची उत्सुकता आहे. भुगाव, कासरआंबोली, माण , पिरंगुट, हिंजवडी की कोळवन या गणात या प्रवर्गाचे मतदार अधिक असल्याने नेमक्या कोणत्या गणात ही जागा आरक्षित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Share