खेळ खेळाडूमहाराष्ट्र
Trending
क्रिकेटपटूंचे आमदार स्विंगकिंग सदानंद मोहोळ – चंदू बोर्डे, मुळशीकरांचे दैवत आप्पासाहेब- संजय दुधाणे
पितृतुल्य सदानंद मोहोळ यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन,

भारताचे माजी कसोटीपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट संघाचे वेगवान गोलंदाज सदानंद मोहोळ यांचे शनिवारी रात्री ११.३०च्या सुमारास ह्दयविकाच्या धक्क्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. सदानंद मोहळ यांच्या पश्चात पत्नी शिला आणि मुलगा कृणाल असा परिवार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता वैवुंâठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवगंत सदानंद मोहोळ यांना क्रिकेटपटू चंदू बोर्डे व क्रीडा अभ्यासक संजय दुधाणे
यांनी वाहिलेली ही शब्दांजली….
क्रिकेटपटूंचे आमदार स्विंगकिंग सदानंद मोहोळ – चंदू बोर्डे
क्रिकेटसंघाची निवड होत असताना तेव्हा बिनविरोध निवड केल्या जाणार्या खेळाडूंच्या यादीत सदानंदचे नाव सर्वप्रथम असे. एक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून रणजी संघात तो प्रथम क्रमांकावर असायचा. नवीन चेंडूवर टप्प्यावर बॉल टाकून तो दोन्ही स्विंग करीत असे. फलंदाजाचा तो कर्दनकाळ होता. तो महाराष्ट्र संघास उत्तम प्रकारे सुरुवात करुन देत असे. मी महाराष्ट्र रणजी संघाचा अनेक वर्षे कर्णधार होतो आणि सदानंदच्या बॉलिंगवर माझा दांडगा विश्वास होता. त्यानेही माझा कधी अपेक्षाभंग केला नाही. तो भरवशाचा खेळाडू होता.

दक्षिण विभागात मुंबईचा संघ सर्वांत बलाढ्य म्हणून समजला जातो. त्या संघात आणि महाराष्ट्र संघात अगदी चुरशीच्या मॅचेस होत असत. त्या वेळी मी कर्णधार असताना मुंबई संघास हरविले, त्यात सदानंदचा महत्त्वाचा हिस्सा होता. आता त्यावेळचे दोन्ही संघाचे खेळाडू भेटतात आणि खेळाची चर्चा होते तेव्हा सदानंदच्या भेदक गोलंदाजीचाच विषय असतो आणि त्यामुळे सुखद आठवणींना उजाळाही मिळतो. मला माहित आहे की, सदानंदने मुंबईकरिता खेळावे, असा प्रस्ताव दिग्गज खेळाडूंकडून आला होता. तो सदानंदने नाकारला. ज्या वेळी तुम्ही मुंबई संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता तेव्हा भारताची निवड समिती त्याची दखल घेते. अगदी सदानंदच्या बाबतीतही तसेच झाले.
1967 मध्ये सदानंद मोहोळची इंग्लंड दौर्यासाठी निवड झाली आणि मला उपकप्तान म्हणून निवडले गेले. आमच्या दोघाचा सत्कार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात आला. मोहोळ कुटुंबात खेळाला फार महत्त्व आहे. ही परंपरा वडिलोपार्जित आहे. सदानंदचे वडील मामासाहेब मोहोळ कुस्तीत नावाजलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर भरघोस महत्त्व प्राप्त करुन दिले. त्यांच्यामुळेच आताही या खेळात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. खेळाची व खेळाडूंची ते नेहमी विचारपूस करीत होते. या समारंभात ते रमून जात होते. काही कमतरता असेल तर तिचा पाठपुरावा करुन निकालही लावत असत. हेच खेळावरील प्रेम त्यांच्या तिन्हीही मुलांत मला अनुभवायास मिळाले. सदानंद, अशोक मोहोळ हे दोघेही महाराष्ट्र रणजी ट्रॉफी संघात माझ्या कॅप्टनशिपखाली खेळलेत. दोघानी चांगल्या प्रकारे गोलदाजी क ं रून उत्तम प्रकारे यश मिळवून दिले. दोघांनीही बोलिंगवर प्रतिस्पर्धकांस बेजार केले. माझे हे दोघे हुकमी एक्के होते. अशोकला राजकारणात
गोडी असल्याने वडिलोपार्जित बाळकडू मिळाले, त्यामुळे महारष्ट्र रणजी संघाला एका होतकरु गोलंदाजास मुकावे लागले.
सदानंदला खेळाचे प्रेम अधिक तेव्हा त्याचा कल खेळांकडे असल्यामुळे माझी आणि सदानंदची जवळीक बरीच वर्षे आहे. या संगतीमुळे एकत्र रणजी मॅचेस बरीच वर्षे खेळलो.
सदानंद दोन्ही प्रकारचे स्विंग करत असे. हिरवळीच्या खेळपट्टीवर त्याचा (इन आणि आऊट स्विंग) आत जाणारा आणि बाहेर जाणारा स्विंग खेळताना फलंदाजास खेळणे मोठे आव्हान असायचे.कितीही चांगला फलंदाज असला तरी तो डोळ्यांत तेल घालून चाचपडत खेळत असायचा तसेच बॅटिंगच्या खेळपट्टीवर त्याचे लेगकटद्वारे स्लिप व विकेट किपर अगदी अटेन्शनमध्ये उभे राहत व प्रत्येक बॉलवर आपल्याकडे कॅच येईल असे समजून सावध पवित्रा घेत असत. 1967 मध्ये सदानंदची बोलिंग इंग्लंडच्या खेळपट्टीवर प्रभावी होई व तेथील वातावरणास अनुकूल ठरत असे, कारण इंग्लंडने त्यांच्या गोलंदाजीकरिता उपयुक्त ठरतील अशा खेळपट्ट्या तयार केल्या होत्या. हे वास्तव होते, त्यामुळे सदानंदसारखा गोलंदाज यशस्वी होईल, असे निवड समितीला योग्य वाटले. या कारणामुळे सदानंदला संघात स्थान लाभले आणि त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा राहिली. भारत संघातील भुवनेश्वर जसा स्विंग गोलंदाजी करतो, त्याच प्रकारे सदानंदची बोलिंग भारतीय संघास लाभदायी झाली असती, वयाच्या 80 गाठली तरी नवा जेंडू दिला तरी पूर्वीसारखेच आत-बाहेर स्विंग टप्प्यावर टाकून फलंदाजास तो जखडून ठेवेल, यात तिळमात्र शंका नव्हती. स्विंग कसे करायचे, ते या ‘किंग’कडून शिकाण्यासारखे होते.
सदानंदला आम्हा आमदार म्हणायचो. क्रिकेटपलीकडे आमचे नाते होते. कुस्ती क्षेत्रातील मोहोळ परिवारातील सदानंद हा माझा उजवा हात होता. तो गेल्याने महाराष्ट्राचे क्रिकेट पोरके झाले आहे. त्याच्या आठवणी, त्याची साथ मी कधीच विसरू शकणार नाही.
——————————————————————————————————–
मुळशीकरांचे दैवत आप्पासाहेब- संजय दुधाणे
देशासाठी क्रिकेट मैदान गाजविणारे सदानंद मोहोळ हे आमच्यासाठी पितृतुल्य आप्पासाहेब होते. त्याची भेट ही नव उर्जा देणारी असायची. आप्पासाहेब आम्हां मुळशीकरांचे दैवत होते. क्रिकेटच्या मैदानात फुललेली खिलाडूवृत्ती आप्पांनी आयुष्यभर जोपासली. आनंदासाठी खेळ ही मामांच्या कुस्ती आखाड्यातील मंत्र आप्पांनी क्रिकेटच्या पीचवर सिध्द केला. क्रिकेटमधील चेंडू त्यांच्याशी गप्पा मारत अशी आश्यायिका होती. यामुळे त्रिफळा उडविणे ही त्यांची खासियत बनली. हॅटट्किच्या पलीकडील विक्रम त्यांच्या गोलंदाजीने घडविला. सलग चार चेंडूत चार बळीचा आप्पांचा करिश्मा आजही देशाच्या क्रिकेट इतिहासातील लखलखंणार पान समजले जाते.

कुस्तीमहर्षीच्या घरातील आप्पा व अण्णा ही जोडी म्हणजे महाराष्ट्राच्या क्रिकेट भूमीतील राम-लक्ष्मणच होते. तरीही मराठमोळ्या मातीवरील कुस्ती आणि कबड्डी खेळावर दोघांनी मनसोक्त प्रेम केले. मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरीला देण्यात येणारी गदा असो वा क्रीडापटूंचे कौतुक, आपण मैदानाशी जुळलेली नाळ शेवटपर्यंत कायम राहिली.
माझ्या पुस्तक प्रकाशन व सत्काराच्या कार्यक्रमातील सदानंद आप्पांच्या भेटीचा चौकार माझ्यासाठी अनमोल ठेवाच आहे. भुगाव येथील कथा ऑलिम्पिकच्या पुस्तक प्रकाशनानिमित्त आप्पा वडिलकीच्या नात्याने मला शुभेच्छा देण्यासाठी आवर्चून आले होते. आपल्या आशिवार्दाने माझी लंडन ऑलिम्पिकची वारी यशस्वी झाली. लंडन ऑलिम्पिकवरून आल्यानंतर अष्टपैलू दिवाळी अंकाचे प्रकाशन आप्पांच्या हस्ते करण्यात आले. तेव्हा आप्पांचा पुणेरी पगडी आणि 75 पुस्तके देऊन केलेला अमृतमहोत्सवानिमित्तचा केलेला सत्कार मला आजही आठवतो.

मार्च 2013 मध्ये आप्पांसह अशोक अण्णा मोहोळ माझ्या ऑलिम्पिक अमृतानुभव पुस्तक सोहळ्यात प्रेक्षकांमध्ये पहिल्या ओळीत बसले होते. आप्पांनी माझे कौतुक केले. माझ्या पुस्तक प्रकशनाचा चौकरही आप्पांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार समारंभाने पार पडला. 24 एप्रिल सचिन तेंडुलकरच्या जन्मदिनी त्याच्यावरील धु्रवतारा चरित्र पुस्तकाच्या 9 व्या आवृत्तीचे प्रकाशन सदानंद आप्पा व चंदू बोर्डेच्या हस्ते झाले. तेव्हाही आप्पांनी क्रिकेटमय होऊन जुन्या आठवणींना उजाळा दिलात. आपल्या उपस्थितीमुळे माझ्या क्रीडा कार्यक्रमाचा चौकार अधिकाधिक रंगत गेला. 5 दशकापूर्वी आपण क्रीडांगणात आणि आता मैदानाबाहेर आपण चहात्यांची मने जिंकत राहिला.
जीवनाच्या मैदानातही आपण बाजी मारत राहिला. ज्ञानदानाचे दीप दुर्गम भागात तेवत ठेवण्यासाठी आपण करीत असलेली धडपड सार्यांनाच प्रेरणादायी आहे. अप्पा आपले दूरवरील दर्शन आनंदाच्या लहरी घेऊन येतात, आपला भेट चैतन्य निर्माण करते, आपल्याशी संवाद नवं बळ देतो, आपला आशीर्वाद म्हणजे यशोमंत्रच. नाबाद 83 पल्ला गाठताना आम्ही पाहिला, आपण शतकवीर झाला नाहीत ही उणीव कायम मनात घर करून राहिल….
शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी सुजाण नागरिक व्हावे यासाठी 3H पॅटर्न आपल्या प्रत्येक भाषणांमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगत. पहिला H म्हणजे डोके आपले डोके सतत चांगल्या कामासाठी वापरावे अभ्यासात वाचनात चांगले विचार करण्यात गुंतवावे. दुसरा H म्हणजे हार्ट आपल्या हृदयात दिन दुबळ्यांसाठी पीडितांसाठी दया उत्पन्न व्हावी. तिसरा H म्हणजे हॅन्ड आपले हात सतत राबवत असले पाहिजेत हाताला सतत कष्ट करण्याची सवय लावावी.
स्वर्गीय आप्पा साहेबांचा जन्म 6/10/1938 या दिवशी वसई येथे झाला. 9वी पर्यंतचे शिक्षण हे वसई येथे व पुढील शिक्षण हे पुणे येथे झाले. क्रिकेट या खेळामध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चार बॉल मध्ये चार विकेट, पुणे विद्यापीठ संघाचे नेतृत्व करताना अजिंक्य पद प्राप्त करणे, महाराष्ट्र रणजी खेळाडू, भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले.
Share