माय मुळशी
Trending
मुळशीत सोशल मिडीयाचा हेल्पिंग पॅटर्न, पोस्टमुळे मालेमधील बारा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत

महावार्ता न्यूज: सोशल मिडीयावरील चॅटींगमुळे सध्या अनेक वाद होत असल्याच्या त्यावरून गुन्हेही घडल्याच्या अनेक घटना आपल्याला पहावयास मिळतात. पण कोथरूडच्या रामबाग कॉलनीतील व्हॉटस अपग्रुपवरील माहिती वाचून बेळगावचे डाॕ.अरूण जोगळेकर या उद्योजकाने माले (ता.मुळशी) येथील सेनापती बापट विद्यालयातील बारा विद्यार्थ्यांच्या वर्षभराच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद केली आहे. या शाळेचे संस्थापक रामचंद्र दातीर यांच्या विद्यार्थी मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत जोगळेकर यांनी सामाजिक बांधिलकीतून मदच केली.
मुळचे कोकणातील असलेले जोगळेकर पुण्यातील व्यावसायिक आहे. कोकणातून मालेमार्गे पुण्यात येताना त्यांनी सेनापती बापट शाळेतील अनवाणी चालणारी मुले पाहीली. सेनापती बापटांचे स्वातंत्र्यातील योगदान त्यांनी यापूर्वी वाचलेही होते. ते रामबाग कॉलनीच्या व्हॉटस अप ग्रुपमध्ये सहभागी आहेत. याच ग्रुपमध्ये मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाचे संस्थापक रामचंद्र दातीरही सहभागी आहेत. ते माले, खेचरे, वांद्रे शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांना मदतीसाठी आवाहन करणारी पोस्ट या ग्रुपवर टाकतात.
तीच पोस्ट वाचून जोगळेकर यांनी दातीर यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या घरी जावून वीस हजार रूपयांचा धनादेश देत गरजूंसाठी त्याचा उपयोग करण्यास सांगितले. त्यानुसार या शाळेत इयत्ता दहावीत 90.20 टक्के गुण मिळवून प्रथम आलेली स्नेहा गेणू पवार आणि 82.20 टक्के गुण मिळवून दुसरी आलेली अर्पिता अनिल गायकवाड यांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची मदत केली. तर इतर वर्गातील दहा मुलांना वर्षभराच्या शिक्षणासाठी मदत केली.
ना नाते ना ओळख असे असताना केवळ गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या दातीर यांच्या सोशल मिडीयावरील पोस्टमुळे जोगळेकर यांनी सामाजिक बांधिलकीतून तरतूद केली. त्यामुळे माले परिसरातील बारा विद्यार्थ्यांच्या कुटूंबामधील पालकांचा मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा भार कमी झाला. याबद्दल पालकांनीही जोगळेकर यांचे आभार मानले.
Share