खेळ खेळाडू
Trending

पुण्यात नॅशनल गेमचे सराव शिबिर सुरू, महाराष्ट्राने विजेतेपद जिंकून राज्याचा नावलौकिक उंचवावा – अजित पवार 

स्पर्धेत ३४ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू व प्रशिक्षकांचे पथक : नामदेव शिरगांवकर

महावार्ता न्यूज:  खेळाडूंनी कोणतेही आर्थिक किंवा मानसिक दडपण न ठेवता निश्चित मनाने सर्वोत्तम कामगिरी करावी आणि आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद मिळवून राज्याचा नावलौकिक उंचवावा, असे आवाहन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष  अजित  पवार यांनी येथे महाराष्ट्राच्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना केले.
आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्राच्या विविध संघांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या संघांना महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनतर्फे  पवार यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि राज्याचे नवनियुक्त क्रीडा आयुक्त श्री. सुहास दिवसे हे उपस्थित होते.
श्री. पवार यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्राच्या संघांकरिता सव्वाचार कोटी रुपयांची यापूर्वीच तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूंना आणखी काही मदत लागली तरी त्यासाठी आम्ही शासनाकडे त्वरित संपर्क साधून हा निधीही मिळवून देऊ. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना भरघोस बक्षीसे आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंनी आत्मविश्वासाने आणि सकारात्मक वृत्ती ठेवून विजेतेपद मिळवण्यावरच लक्ष केंद्रित करावे. येथील शिबिरात अव्वल दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्राचे खेळाडू सर्वोच्च यश मिळवतील अशी मला खात्री आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतहून सोन्याचा खजिना लुटून आणला होता. आता महाराष्ट्राच्या खेळाडूंनी गुजरातमधून सोनेरी पदकांची लयलूट करावी, असे सांगून श्री. दिवसे म्हणाले, आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंना उत्तम दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण दिले जात आहे तसेच अन्य तज्ञांचे मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. हे मार्गदर्शन केवळ स्पर्धेपुरते न राहता त्यांना भावी जीवनासाठीही उपयुक्त होईल. खेळाडूंनी मैदानावर आणि मैदानाबाहेरही शिस्त आणि चांगले वर्तन ठेवावे मैदानावर खिलाडू वृत्तीने वागावे. फक्त या राष्ट्रीय स्पर्धांसाठी नव्हे तर आगामी काळात आहे राज्यातील खेळाडूंच्या विकासासाठी राज्य शासन व महाराष्ट्र ऑनलाईन असोसिएशन हे एकत्रितरित्या काम करणार आहेत.
सर्वोत्तम सुविधा सवलती अव्वल दर्जाचे प्रशिक्षण याच्या जोरावर महाराष्ट्राचे खेळाडू आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवतील, असा आत्मविश्वास व्यक्त करीत श्री. शिरगावकर म्हणाले, या स्पर्धेतील ३४ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राचे जवळजवळ नऊशे खेळाडू व प्रशिक्षकांचे पथक सहभागी होत आहे. स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंची विविध ठिकाणी शिबिरे सुरू आहेत. शिबिरातील खेळाडू किंवा प्रशिक्षकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, यासाठी आम्ही असोसिएशनतर्फे प्रत्येक खेळासाठी एक समन्वय अधिकारी नियुक्त आला आहे. तसेच राज्याच्या क्रीडा खात्यातर्फेही एक समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक खेळाडूची अतिशय योग्य रीतीने काळजी घेतली जात आहे. त्यामुळे खेळाडूंना कोणत्याही समस्या येणार नाहीत अशी मला खात्री आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना विमानानेच पाठवले जाणार आहे.
या समारंभास राज्याचे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे तसेच महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे खजिनदार धनंजय भोसले आणि अनेक क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. या समारंभातच महाराष्ट्राच्या विविध संघांच्या कर्णधारांचा सत्कार करण्यात आला.

Share

Maha Varta

महावार्ता हे न्यूज पोर्टल असून देशविदेशासह महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी मराठी वाचकांपर्यंत देत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close