
संतमालिकेचे आम्ही विष्णुदास ।
जनहिता उगाळुनि घेऊ स्वत:स ॥
सन 1956 उजाडलं. माघ महिना चालू होता. नेहमीप्रमाणे रात्री साधना करून प्रेमनिधी संत गणोरेबाबा विश्रांती घेत होते. पौर्णिमेला पाचच दिवस राहिले होते. माघ शुध्द दशमीचा सुदिन उगवला. वार गुरूवार. या शुभदिनी श्री प्रेमनिधी संत गणोरेबाबांना तुकोबारायांनी स्वप्नी दर्शन दिले. उपदेश करून मंत्र दिला. मस्तकावर हात ठेवून तुकाराममहाराज क्षणात अदृश्य झाले.
ॐ हरिराम विठ्ठलाय नमः – नामजप I संत गणोरेबाबा

माघ शुध्द दशमीच्या पवित्र दिवशी श्री बाबांना तुकोबारायांनी मार्ग दाखविला नाही तर ते जणू तुकोबारूपच झाले. विठ्ठलोपासना करीत पुढील एकतप श्री प्रेमनिधी संत गणोरेबाबांनी तुकोबांनी दिलेला मंत्र जपला, जोपासला. अंगीकारला आणि सिध्द केला. एका तपाच्या तपश्चर्यने श्री बाबा सिध्दपुरूष झाले. संत महात्म्य बनले.
माघ शुध्द दशमीला तुकाराममहाराजांनी श्री गणोरे बाबांना स्वप्नी मंत्र दिला. काय योगायोग ! तुकोबारायांना याच पुण्यदिनी बाबाजी चैतन्यांनी स्वप्नातच मंत्रदीक्षा दिली होती. रामकृष्णहरी मंत्र दिला. तोही गुरूवार, हाही गुरूवार. महाराज आपल्या गाथेत म्हणतात…
सद्गुरूरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांही ॥…….
बाबाजी आपलेे सांगितले नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥
माघशुध्द दशमी पाहुनि गुरूवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥

तुकोबारायांना विठ्ठलाची उपासना व रामकृष्णहरी हा मंत्र जसे प्रिय होते तसे ज्ञानेश्वर नामदेवनाथदिकांच्या ग्रंथाचे श्रवणमननाची गोडी होती. गुरूंनी त्यांना स्वप्नी विठ्ठलभक्तीचाच रामकृष्णहरी मंत्र देऊन पूर्वीचा साधनक्रमच पुढे चालविण्याचा आशीर्वाद दिला. श्री गणोरेबाबांच्या साधनेत तुकोबांप्रमाणेच विठ्ठलभक्ती, विठ्ठला पांडुरंगा हे नाम आणि ज्ञानेश्वरी चिंतनाचा अनोखा त्रिवेणी संगम होता. श्री बाबांनाही गुरू तुकोबारायांनी स्वप्नी हाच वारसा पुढे सुरू ठेवण्याचा मंत्र दिला.
भुकूूम मठातील किर्तन महोत्सवला मोठा प्रतिसाद, मंगळवारी 31 जानेवारीला भंडारा
जगद्गुरू तुकाराम महाराजांना माघ शुद्ध दशमीच्या शुभदिनी बाबाजी चैतन्यांची गुरूकृपा झाली. तो दिवस गुरूवाराचा होता. याच सुदिनी तुकोबारायांनी संत गणोरेबाबांना स्वप्नात मंत्र देवून उपदेश केला. तो दिवसही गुरूवारच. या दोन्ही थोर विभूतींच्या ईश्वरी साक्षात्काराचा एकच मंगलदिन. माघ शुध्द दशमीच्या मंगल दिनाबाबत श्री बाबा म्हणत असे,
सुवेळ सुदिन आज उदेला ।
तुका धन्य झाला गुरू कृपे ॥1॥
सकळ पुण्याई आज फळा आली ।
गुरूकृपा झाली तुकयापरी ॥2॥
आनंद वाटला तिन्ही भुवनी ।
साधली उन्मनी सहजस्थीती ॥3॥
उजळल्या सकल दशदिशा ।
जागा न प्रकाशा तेथे उरली ॥4॥
तोचि मास तोचि दिवस ।
केला उपदेश श्रीरामासी ॥5॥
माघ शुद्ध दशमी गुरूवार दिनी ।
लागतसे चरणी श्रीराम दास ॥6॥
1956 मध्ये संतशिरोमणी तुकाराममहाराजांनी माघ शुद्ध दशमीच्या दिनी श्री गणोरेबाबांना स्वप्नात मंत्र दिला. हा मंत्र श्री बाबांनी 12 वर्षे जपला. या नामसाधनेच्या तपातूनच संत गणोरेबाबांचा जन्म झाला.
प्रेमनिधी संत गणोरेबाबा चरित्र गाथा
माघ शुद्ध दशमीला संत तुकारामांनी उपदेश केल्याने या पुण्यदिनी श्री बाबांनी हरिराम आश्रय मठावर उत्सव सुरू केला. हा उत्सव गेली 4 दशके अखंड नामस्मरण सप्ताहाने साजरा केला जातो. दशमी आधी सात दिवस माघ शुध्द तृतीयापासून काकड्याने दशमीच्या उत्सवाचा मंगलमय प्रारंभ होतो. संत तुकाराम गाथेचे, श्री बाबांच्या ‘ॐ हा गुरू’ ग्रंथाचे पारायण, हरिपाठ असे सकाळचे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी श्री बाबांच्या अभंगाचे भजन, प्रवचन आणि रात्री कीर्तन अशी दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते.
Share