माय मुळशी
Trending
तब्बल 20 वर्षांनी अनुभवली पुन्हा शाळा, मुठ्यात माजी विद्यार्थी- शिक्षक स्नेहसंमेलन मेळावा संपन्न

महावार्ता न्यूज ः मुळशीतील मुठा गावातील मामासाहेब मोहोळ विद्यालय, सन.१९९७ते२००२ च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल वीस वर्षानंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या एक दिवसीय स्नेह मेळाव्यात सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले.
शालेय जीवनानंतर वेगवेगळ्या दिशांना पांगलेल्या मित्र-मैत्रिणींनी वयाची बंधने झुगारून या एकत्रीकरणाच्या सोहळ्याचा आनंद घेतला. मुठा गावच्या ‘मामासाहेब मोहोळ विद्यालय, मुठा. या ठिकाणी त्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. विद्यालयाचे माजी विद्यार्थी मुकेश भरेकर, अंकुश तिकोणे, गणेश मोहोळ, निलेश मोहोळ, ज्ञानेश्वर अष्टेकर, अतुल शेडगे, मोहिनी महाडिक,सारिका साळुंखे, रूपाली मोहोळ, रूपाली पवार, उषा मोहोळ यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते.
अनेक विद्यार्थी जवळजवळ वीस वर्षानंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र- मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. या कार्यक्रमाची सांगता सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या स्वागत, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा पासून सुरू झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी “न्यू इंग्लिश स्कूल कोळवण “चे मुख्याध्यापक अमर बनसोडे सर तसेच प्रमुख पाहुणे गरुड सर, भालेराव सर, निकाळजे सर दाभाडे सर, भोजने सर तसेच मामासाहेब मोहोळ विद्यालयातील मुख्याध्यापक श्रीकांत मोहोळ सर, सर्जेराव सर, बडे मॅडम आणि मदतनीस प्रीती लांडगे हे सर्व व्यासपीठावर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी मोहिनी महाडिक, रूपाली मोहोळ, सारिका साळुंखे यांनी केले. तर रूपाली पवार हिने आपल्या गुरुजनांवर एक सुंदर कविता सादर केली. तर आभार प्रदर्शन अंकुश तिकोणे, निलेश मोहोळ यांनी केले. दीप प्रज्वलानंतर मामासाहेब मोहोळ विद्यालयातील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांने माजी विद्यार्थी- शिक्षकांवर एक छोटेसे भाषण केले. सर्व उपस्थित मान्यवरांना श्रीफळ, शाल, गुलाबाची फुले, मराठी साहित्याची पुस्तके,आदर्श शिक्षक ट्रॉफी अशा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला यावर्षी या माजी विद्यार्थ्यांनी मामासाहेब मोहोळ विद्यालयाच्या सर्व इलेक्ट्रॉनिक वायरिंग नवीन करून देण्यासाठी आश्वासन दिले.
Share