टाटा पॉवरच्या ‘ऊर्जा मेळ्या’त 250 विद्यार्थ्यांचा सहभाग,

 ‘ऊर्जा मेळा’मुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना विज्ञानातील कौशल्य दाखवण्यासाठी मिळाले व्यासपीठ
भिरा : मुळशी, भिरा, मावळ आणि भिवपुरी येथील २१ ग्रामीण शाळांमधील सुमारे २५० विद्यार्थी टाटा विद्यालय, भिरा येथे टाटा पॉवरच्या ‘ऊर्जा मेळ्या’साठी एकत्र आले. या मेळ्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली विज्ञान प्रतिकृती सादर केली. यातील अनेक प्रतिकृती साध्या साहित्याचा वापर करून बनवण्यात आल्या होत्या. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या गावांमध्ये अनुभवलेल्या समस्यांपासून प्रेरणा घेऊन या प्रतिकृती तयार केल्या होत्या.

याशिवाय, निबंध लेखन, प्रश्नमंजुषा, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक विचारसरणी, सांघिक कार्यक्षमता आणि आत्मविश्वासाने विचार मांडण्याची क्षमता दाखवून दिली. टाटा पॉवरचे हायड्रो विभागाचे प्रमुख श्री. अजय कोन्नूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. त्यांनी विद्यार्थ्यांना सतत प्रश्न विचारत राहण्याचे आणि नवनवीन गोष्टी शिकत राहण्याचे प्रोत्साहन दिले. अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय ऊर्जा मेळ्यात स्थान मिळवले. ही त्यांच्या शाळांसाठी आणि कुटुंबीयांसाठी अभिमानाची बाब ठरली.
या दिवसातील सर्वात उल्लेखनीय क्षणांपैकी एक म्हणजे मावळ येथील वाघणगाव जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींनी जर्मन आणि जपानी भाषेत सादर केलेले नाट्य. ग्रामीण भागातील शाळेत शिकणाऱ्या या चिमुकल्या मुलींनी परदेशी भाषांमध्ये रंगमंचावर इतक्या आत्मविश्वासाने सादरीकरण करून दाखवले की, प्रतिभेला कोणतीही सीमा नसते, हे त्यांनी सिद्ध केले.
विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विज्ञानाचा उत्सव साजरा केल्यामुळे टाटा विद्यालयाचा परिसर आनंद आणि उत्साहाने भरून गेला होता. टाटा पॉवरसाठी ऊर्जा मेळा हा आपल्या जलविद्युत प्रकल्पांच्या आसपासच्या समुदायांप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. कंपनीने गेल्या शतकाहून अधिक काळ या भागांमध्ये कार्य केले आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिकण्यासाठी, प्रगती करण्यासाठी आणि आपले कौशल्य जगासमोर आणण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत, टाटा पॉवर या समुदायांसोबत विश्वासाचे आणि सद्भावनेचे नाते अधिक दृढ करत आहे.

See also  मुळशीत आज कोण ठरणार भाग्यवान ? जिल्हा परिषदसह पंचायती समितीचे आज आरक्षण सोडती