


कोल्हापूर 11 newsdesk
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि आर्थिक स्वावलंबनाच्या विचारांना पुढे नेत आंबेडकरी चळवळीतील जनतेला आर्थिकदृष्ट्या सक्षम व साक्षर करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (११ सप्टेंबर) स्मारक भवन येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सहकुटुंब मेळाव्यात द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र अशोक आंबेडकर प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे अहवाल माधुरी जाधव आणि साताप्पा कांबळे यांच्यासह संयोजकांनी केले आहे .
आंबेडकरी चळवळीने सामाजिक परिवर्तनाबरोबरच आर्थिक स्वावलंबनालाही महत्त्व दिले पाहिजे, या भूमिकेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, संघटन आणि संघर्षाबरोबरच समाजातील नागरिकांनी आर्थिक व्यवहारांचे ज्ञान आत्मसात करून बचत, गुंतवणूक, व्यवसाय, रोजगारनिर्मिती आणि सहकाराच्या माध्यमातून स्वतःची आर्थिक ताकद उभी करणे गरजेचे आहे. या व्यापक भूमिकेतून मेळाव्यात आर्थिक क्षेत्रातील विविध संधींची माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी मोबाईल बँकिंग, एबीएससी आणि बुद्धिस्ट को-ऑपरेटिव्ह यांसह आर्थिक क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या कार्याची व उपलब्ध सुविधांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. आधुनिक डिजिटल आर्थिक व्यवहारांचा सुरक्षित वापर, आर्थिक नियोजन, सहकाराच्या माध्यमातून समाजाची आर्थिक उभारणी आणि उपलब्ध आर्थिक साधनांचा योग्य पद्धतीने वापर याबाबत मार्गदर्शन करण्यावर भर राहणार आहे.
‘सामाजिक परिवर्तनाबरोबर आर्थिक परिवर्तनही आवश्यक’
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित आणि शोषित समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षणाला जितके महत्त्व दिले, तितकेच आर्थिक स्वावलंबन आणि संघटित शक्तीलाही महत्त्व दिले. त्यामुळे आंबेडकरी चळवळ केवळ सामाजिक हक्कांच्या लढ्यापुरती मर्यादित न राहता समाजाच्या आर्थिक प्रगतीचे माध्यम बनली पाहिजे, अशी भूमिका आयोजकांनी मांडली आहे.
आजच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या काळात बँकिंग, मोबाईल बँकिंग, डिजिटल व्यवहार, सहकारी संस्था, व्यवसाय व उद्योजकता याबाबत प्रत्येक कुटुंबाला मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. आर्थिक अज्ञानामुळे अनेकदा उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ समाजातील नागरिकांना घेता येत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी आर्थिक साक्षरतेचे उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याचा संकल्प या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
कोल्हापुरात विविध आर्थिक उपक्रमांचा प्रारंभ
आंबेडकरी चळवळीतील जनता आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, युवकांनी व्यवसाय व उद्योजकतेकडे वळावे आणि कुटुंबांच्या आर्थिक नियोजनाला दिशा मिळावी, यासाठी लवकरच कोल्हापुरात भारतीय बौद्ध महासभा आणि द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. त्याची रूपरेषा व महत्त्वाची माहिती मेळाव्यात देण्यात येणार आहे.
या माध्यमातून समाजातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी, स्वयंरोजगार, व्यवसायविकास, सहकार आणि आर्थिक संस्थांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक संघटनशक्तीला आर्थिक संघटनशक्तीची जोड मिळाल्यास समाजाच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळू शकते, असा आयोजकांचा विश्वास आहे.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी दिव्य स्वप्न बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका व मुख्य समन्वयक माधुरी जाधव, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सातापा कांबळे, राष्ट्रीय संघटक महेश धर्मरक्षित यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
या मेळाव्यास अनिल तळवडे, दिलीप कांबळे, संदीप कांबळे, अशोक हिरामणी, रमेश कांबळे, विनोद कांबळे, ज्योती थडके, बाळकृष्ण गणेशचारी यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी सामाजिक परिवर्तनासोबत आर्थिक परिवर्तनाची चळवळही मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येने सहकुटुंब या मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य समन्वयक माधुरी जाधव – साताप्पा कांबळे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.










