


महावार्ता न्यूज: ” दोंदेकर बुवांच्या गायकीचा ठेवा जतन करून ठेवणे हेच त्यांचे खरे पुण्यस्मरण होईल. गायनाचार्य दोंदेकर बुवा म्हणजे सिद्ध पुरुष होऊन गेले. त्यांच्या गायनातून रसिकांना ईश्वरप्राप्तीचा आणि अलौकीक आनंदाचा अनुभव यायचा. त्यांच्या भजनांची स्वतंत्र ध्वनिमुद्रिका काढून त्यांच्या जीवनचरित्रावर स्मरणिका काढल्यास नवोदित कलाकारांना प्रेरणादायी ठरेल. मुळशीतील लवळेकरांनी दोंदेकर बुवांच्या गाण्यावर केलेले प्रेम आणि गायनाचा जतन करून ठेवलेला ठेवा हा कलाकारांसाठी आनंदाचा ठेवा आहे. गुरूजींची गायनाची परंपरा लवळेकरांनी अशीच पुढे चालू ठेवणे हीच त्यांना आदरांजली आहे. ” असे प्रतिपादन राधाकृष्ण गरड यांनी केले. लवळे (ता. मुळशी) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित केलेल्या वैकुंठवासी गायनाचार्य मारुतीबुवा दोंदेकर गुरूजी यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात गरड बोलत होते. दोंदेकर बुवांचे शिष्य बबन घुणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी दशरथ महाराज वहाळे, चंद्रकांत महाराज मारणे, माजी सरपंच संजय सातव, रवींद्र शितोळे, गजानन राऊत, धोंडिबा केदारी, राजेंद्र शितोळे, वाघ बुवा, मारुती सातव, बाळासाहेब कुदळे, राम कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व महिला अध्यापकांनी भजने सादर केली. त्यानंतर दोंदेकर गुरूजी यांचे शिष्य राधाकृष्ण गरड यांचे मंत्रमुग्ध करणारे गायन झाले. त्यांच्या गायनाने दोंदेकर बुवांच्या गायकीचा श्रोत्यांना अनुभव आला. त्यांना तबल्याची साथ शिवाजी कदम यांनी तर हार्मोनियमची साथ समीर काशीलकर व टाळाची साथ ओंकार कदम यांनी केली.














