गोकुळच्या शासननियुक्त चार संचालकांमुळे चेअरमन निवडीचा सस्पेन्स वाढला!

मंगळवारच्या निवडीत सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकीय कौशल्याचा कस
कोल्हापूर (राजेंद्र मकोटे) : गोकुळच्या सत्तासंघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे. शासननियुक्त संचालकांना विरोध करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या समन्वयातून निघालेल्या संघर्ष मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र, सायंकाळी न्यायालयाने शासननियुक्त चारही संचालकांना मान्यता दिल्याने मंगळवारी होणाऱ्या चेअरमन निवडीचा सस्पेन्स वाढला आहे.

शिवाजी आडनाईक (पन्हाळा), कृष्णात पाटील (कागल), डॉ. प्रवीण हेंद्रे (हातकणंगले) आणि सांगली जिल्ह्यातील अॅड. प्रशांत पाटोळे या चार सदस्यांच्या समावेशामुळे सत्तेचे गणित नव्याने बदलण्याची शक्यता आहे. विशेषतः सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधीची नियुक्ती चर्चेचा विषय ठरली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह सर्वच नेत्यांची राजकीय कसोटी लागणार आहे. चारही शासननियुक्त सदस्य मतदानात सहभागी होणार की पडद्यामागील चर्चेतून चेअरमन पदासह अडीच-अडीच वर्षांच्या वाटपाचा तोडगा निघणार, याबाबत उत्सुकता आहे. शासन नियुक्त सदस्य संचालक नकोत या मागणीसाठी निघालेल्या
संघर्ष मोर्चातील शक्तिप्रदर्शनानंतर न्यायालयीन निर्णयाने बदललेले राजकीय समीकरण मंगळवारी कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये समन्वयी तोडगा निघून प्रत्येकी अडीच – अडीच वर्षाचे चेअरमन पद विभागणी असा तोडगा निघण्याची शक्यता असल्याची चर्चा जोरात सुरू आहे
See also  गोकुळच्या सत्तासंघर्षात ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचे आक्रमक शक्तिप्रदर्शन!