


दीव ः पॅरा, युवा पाठोपाठ बीच खेलो इंडिया स्पर्धेतही महाराष्ट्राने पदकांची लयलूट करीत आपला ठसा उमटविला. पहिल्या बीच स्पर्धेत महाराष्ट्राने ५ सुवर्णांसह २० पदकांची कमाई करीत उपविजेतेपद पटकावले.
दीवच्या घोघला समुद्र किनाऱ्यावर संपलेल्या स्पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार शेवटच्या दिवसापर्यंत घुमत राहिला. पदकतक्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य, १० कांस्य अशी एकूण २० पदके जिंकून महाराष्ट्राने दुसरे स्थान संपादन केले. ५ सुवर्ण ६ रौप्य, ३ कांस्य अशी एकूण १४ पदकांची कमाई करीत मणिपूरने विजेतेपद खेचून आणले. सर्वाधिक २० पदके जिंकूनही केवळ १ रौप्य पदक कमी असल्याने महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत महाराष्ट्रासह मणिपूर, नागालँड, हरियाणा व जम्मू-काश्मिर संघाने ५ सुवर्णपदके जिंकण्याचा करिश्मा घडविला. रौप्य पदकांच्या शर्यतीत महाराष्ट्र मागे राहिला.

दीव येथील ऐतिहासिक आयएनएस खुकरी स्मारक परिस रातील समारोप समारंभात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला उपविजेतेपदकाचा करंडक देऊन गौरविण्यात आले. पथकप्रमुख नवनाथ फरताडे, क्रीडाधिकारी अरूण पाटील यांच्यासह मराठमोळ्या खेळाडूंनी उपविजेतेपदाचा करंडक स्वीकारला. करंडक स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
खेलो इंडिया स्पर्धेतील यशाबद्दल महाराष्ट्राच्या खेळाडूंचे खडसे यांनी आपल्या भाषणात कौतुक केले. खेलो इंडिया बीच गेम्सने एका नवीन युगाची सुरुवात केली आहे, असे सांगून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पुढे म्हणाल्या की, खेळाडूंनी आपल्या प्रतिभेच्या तेजाने दीवचे समुद्रकिनारे उजळवले आहेत.” खेलो इंडिया बीच गेम्स या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या गेम्सनी अनेक रोमांचक आणि कमी ज्ञात असलेल्या किनारी आणि जल क्रीडांकडे लक्ष वेधले आहे.”

महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा सहसंचालक सुधिर मोरे यांनी दृकश्राव्य प्रणालीव्दारे अभिनंदन केले आहे. प्रथमच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे ७८ खेळाडू सहभागी झाले होते. यात ४८ पुरूष व ३० महिला खेळाडूंचा समावेश होता. पहिल्या स्पर्धेत बीच सॉकर, बीच कबड्डी, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण या स्पर्धेत महाराष्ट्राने पदकाची लयलूट केली. स्पर्धेत भारतातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी भाग घेतला होता.















