


दीव ः युवा स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक केल्यानंतर आता पहिल्या खेलो इंडिया बीच स्पर्धेतही महाराष्ट्र संघाने शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पांरपारिक खेळ पेंचक सिलट प्रकारात महाराष्ट्राने तीन कांस्यपदकांची कमाई केली. शिवाय बीच व्हॉलीबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने यजमान दीवचा ४२-१२ गुणांनी धुव्वा उडवला.
प्रथमच होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचे ७८ खेळाडू सहभागी झाले आहेत. यात ४८ पुरूष¨व ३० महिला खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्या स्पर्धेत बीचसॉकर, बीच कबड्डी, बीच व्हॉलीबॉल, बीच सेपक टकरा, बीच पेंचक सिलट, सागरी जलतरण व रस्सीखेच हे क्रीडाप्रकार रंगणार आहेत. क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे हे महाराष्ट्राचे संघाचे पथकप्रमुख आहेत.
















