मामासाहेब मोहोळ स्मरणार्थ महाराष्ट्र केसरीचे गदेचे पुण्यात पूजन, 1983 पासून मोहोळ कुटुंबियांकडून देण्यात येते मानाची गदा

महावार्ता न्यूज ःधाराशिव येथे सुरू 65 व्या महाराष्ट्र केसरी गदेचे पुण्यात विधिवत पूजन करण्यात आले. कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1983 पासून मोहोळ कुटुंबियांच्या वतीने देण्यात येते.
मोहोळ यांच्या नवी पेठ येथील निवासस्थानी मामासाहेब मोहोळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर गदेचे विधीवत पूजन माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कुस्ती परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी उपमहापौर दिलीप बराटे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष संग्राम अशोक मोहोळ,आबा जगताप ,बाबा कंधारे, शांताराम इंगवले, हिंदकेसरी अमोल बुचडे, अमोल बराटे, सचिन पवळे आदी मान्यवर उपस्थित होतेे.
कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र माजी खासदार अशोक (अण्णा) मोहोळ यांनी मामासाहेबांच्या स्मरणार्थ ‘महाराष्ट्र केसरी’ विजेत्यास ‘गदा’ देण्याची परंपरा सुरू केली. गेली 40 वर्ष अव्याहतपणे मामासाहेब मोहोळ यांचे वंशज ही गदा स्वखर्चाने बनवून राज्य कुस्तीगीर परिषदेला सुपूर्द करुन मामासाहेब मोहोळ यांच्या आठवणींना उजाळा देत आहे.

गदा पूजनानंतर अशोक मोहोळ यांनी मामासाहेबांच्या आठवणी सांगत गदेचे महत्त्व विशद केले. काळ बदलला, कुस्ती गतीमान झाली तरी चांदीची मानाची गदा देण्याची परंपरा आमच्या चौथ्या पिढीचे कायम राखली आहे. महाराष्ट्र केसरीची गदा हे शौर्याचे प्रतिक असून महारष्ट्रातील मल्लांनी गदा जिंकल्यांनंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आखाडे गाजवले पाहिजे.
गदेच्या निर्मितीविषयी सांगताना संग्राम मोहोळ म्हणाले की, यंदाची 15 किलोची गदा असून 32 गेज जाड शुद्ध चांदीच्या पत्रा लावून कोरीव कामांची झळाळी गदेला देण्यात आली आहे. गदेच्या मध्यभागी स्व.मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात आले असून पेशवेकालीन कारागीर पानघंटी ही गदा गेली 38 वर्ष बनवित आहे.
धाराशिव येथे सुरू 65 व्या महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत 20 नोव्हेंबरला होत आहे. या दिवशी ही गदा नव्या विजेत्याला बहाल केली जाईल कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम मोहोळ यांनी तर आभार कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ यांनी मानले.
See also  भोरमध्ये चौरंगी लढत ? थोपटे, कोंडे, मांडेकर, दगडे मैदानात