‘जय श्रीराम’च्या भूमिकेवर ठाम महापौरांचा हिंदू एकता आंदोलनातर्फे सत्कार

“श्रीरामाचे नाव घेऊन मते मागणाऱ्या राजकारण्यांनी महापौरांचा आदर्श घ्यावा” — दीपक देसाई

कोल्हापूर, दि. १५
कोल्हापूर महानगरपालिकेच्या जनता दरबाराची सुरुवात महापौर सौ. रूपाराणी संग्राम निकम यांनी ‘जय श्रीराम’ या घोषणेने केली होती. यावर उपस्थित वकील शेखर सनदे यांनी संवैधानिक पदावर असताना धार्मिक घोषणा का देता, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावर महापौर निकम यांनी, “मी भारतीय नागरिक आहे आणि भारतीय संविधानाने मला धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करू नका,” असे ठाम उत्तर दिले होते.

महापौरांच्या या भूमिकेचे स्वागत करत हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनी, दि. १५ ऑगस्ट रोजी संघटनेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात महापौर सौ. रूपाराणी संग्राम निकम यांचे स्वागत करण्यात आले आणि भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई म्हणाले, “प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन हिंदूंची मते मागणाऱ्या राजकारण्यांनी महापौरांचा आदर्श घ्यावा. निवडणुकीच्या वेळी हिंदूंच्या श्रद्धेचा आधार घ्यायचा, मात्र सार्वजनिक जीवनात ‘जय श्रीराम’ म्हणण्याची काही हिंदुत्ववादी पक्षातील राजकीय नेत्यांनाच लाज वाटते, ही दुर्दैवाची बाब आहे. महापौर निकम यांनी मात्र कोणत्याही दबावाला न जुमानता आपली भूमिका ठामपणे मांडली.”

महापौरांच्या या ठाम, निर्भीड आणि संविधाननिष्ठ भूमिकेचे हिंदू एकता आंदोलनाने स्वागत केले असून, “कोल्हापूरच्या महापौरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,” असा गौरवोद्गार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या वेळी जिल्हा अध्यक्ष दिपक देसाई, गजानन तोडकर, अजिंक्य आपके,हिंदूराव शेळके, बबन लगारे, आनंदराव कवडे, अनिरुद्ध कोल्हापूरे, राजेंद्र करंबे ,विक्रम भोगम व अजिंक्य फोंडेशन चे शेकडो विद्यार्थी तसेच हिंदू एकता आंदोलन चे इतर कार्यकर्ते उपस्थित होते

See also  मुळशीत शंकरभाऊंकडून इच्‍छुकांच्‍या मॅरेथान मुलाखती- मिलिंद वाळंज यांचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन, संग्रामदादांचे इनकमिंग धक्‍कानाट्य-राष्ट्रवादीचे पदाधिकारी भाजपात