मुळशीतील मारुंजी वनक्षेत्रात हुल्लडबाजी; वन्यजीवांची होरपळ, वनक्षेत्रात थर्टी फर्स्ट पार्टी कल्चरकडे वनविभागाची डोळेझाक

महावार्ता न्यूज ः वनक्षेत्रातच चुली पेटवून हुल्लडबाज तरुणाईमार्फत ‘पार्टी कल्चर’ आवाक्याबाहेर गेल्याने मारुंजीसह परिसरातील लगतच्या डोंगर रांगातील वनक्षेत्रात वारंवार वणवे भडकत आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने असलेल्या वन्यजीवांची होरपळ होत असताना मुळशी वनविभाग हतबल झाल्याचे दिसत आहे. हुल्लडबाजीकडे वनविभागाची डोळेझाक असल्याने वन्यजीव पर्यावरणप्रेमी ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे.
आयटी पार्क लगतच वैभवशाली जैवविविधता संपन्न असे दोनशे एकराहून अधिक क्षेत्रावर मारुंजीचे वनक्षेत्र लाभले आहे. मात्र त्याच्या संवर्धनाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जंगलात दररोज मोकार भटकंती करणारांना अटकाव होत नाही. विशेषतः दरवर्षी नाताळच्या सुट्टीकाळात ‘थर्टी फर्स्ट’ साजरी करायला उनाड दारुड्या मंडळींचा मारुंजी वनक्षेत्र अड्डाच झाला आहे. अनेकजण दारूच्या बाटल्या घेवून, जंगलात चिकन, मटण पार्टी करायला चूल पेटवतात, भटकंती करणारे सिगारेट ओढतात, काही मनोविकृत खोडसाळपणे जाणीवपूर्वक काडी लावतात. यामुळे वारंवार वणवे भडकून वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत आहे.
सतरा डिसेंबरला अशाच प्रकारे भीषण वणवा लागून कशाई मंदिरामागील दगड खाणीलगतचे डोंगरातील वनक्षेत्र वणव्यात भस्म झाले. पर्यवरणप्रेमी ग्रामस्थांनी कळवल्यावर वनअधिकाऱ्यांनी रात्रीपर्यंत वणवा विझवला. मागील वर्षीही ३१ डिसेंबरची सर्व रात्र व नवीन वर्षाचा पहिला दिवस हुल्लडबाजांनी वनक्षेत्रात धुडगूस घालत साजरा केला. एकाच दिवशी चार ठिकाणी वणवा लावून जंगल भस्म केले होते. जंगलात चूल पेटवून, लायटिंग माळा लावून, साउंडवर गाणी वाजवून काही आयटीतील तरुण तरुणी चक्क रात्री बारा नंतर रंगेहात पकडण्यात आले होते.
वनक्षेत्रालगत नेरे येथील बड्या गृहप्रकल्पातील रहिवासी होते. वचक बसण्याकरता कारवाई होणे अपेक्षित असताना सर्वांचे याकडे दुर्लक्ष आहे परिणामी ही समस्या आता हाताबाहेर चालली आहे. गुरुवारी शनिवारी, रविवारी तर इथं इतकी भटकी मंडळी विनापरवानगी जातात की हे जंगल वन्यजीवांसाठी आहे की टुकार माणसांसाठी असा प्रश्न निर्माण होतो. जंगलात भटकंती करायला येणारांसाठी परवानगी घेवून, नियम पालन करीत जाणे गरजेचं असताना वन विभागाने कोणत्याच सूचना अथवा कारवाईबाबत फलक मारुंजी वनक्षेत्रालगत लावलेले नाहीत. जनजागृतीचा आभाव आहे. त्यामुळं ‘आओ जाओ जंगल हमारा’ अशाच अविर्भावात दुरदुरून भेटके उनाड लोकं इथं बेधडक घुसतात. वणवा लावून असुरी आनंद घेतात.
 शिकारी पाळीव कुत्र्यांसह जंगलात
जंगलात कुत्रे घेवून गेल्यास शिकारीच्या उद्देशाने प्रवेश केला असे समजले जावं असा आदेश शासनाने काढलाय. त्याकडे वनविभागच गांभीर्याने घेत नसल्याने भटकंती करायला जाणारे अनेकदा सोबत पाळीव शिकारी कुत्रे घेवून मारुंजी सुळक्या पर्यंत व पाठरावर जातात. अनेकदा या पाळीव कुत्र्यांनी मोर, ससे,भेकर,कोल्हा,शिकार केल्याचे ग्रामस्थ सांगतात. मोकाट कुत्र्यांचे तर हें शिकारीचे ठिकाणच बनले आहे.
नेरे, दत्तवाडी, हिंजवडी मार्ग धोक्याचे
मारुंजी जंगलात नेरे दत्तवाडी, एक्सर्बीयामार्गे विनाअडथळा उनाड मंडळी जंगलात थेट गाड्या घेवून जातात. यापूर्वी आम्ही इथं सिसिटीव्ही बसवायला लावले होते. मात्र आता ते काढले व कोणालाही चौकशी होत नसल्याने समस्या गंभीर झाली आहे. कशाई मंदिर मार्गेही बेकायदेशीर प्रवेश जंगलात होतो. हिंजवडीकडून मारुंजी विप्रो सर्कल येथूनही भटके मंडळी थेट पाचीतळे पठार व माण खिंडीत जातात. वणवा लावतात. त्यामुळे जनजागृती व प्रतिबंधकामी उपाययोजना तात्काळ करने गरजेचे आहे
See also  आंतरशालेय नृत्यस्पर्धेत पेरिविंकल अव्वल, सूस शाखेने रोवला मानाचा तुरा