देशभक्तीपर गीतांनी रंगला ‘ऐ मेरे वतन के लोगो’ कार्यक्रम; पत्रकार असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिनाला संगीतमय मानवंदना


कोल्हापूर 15 प्रतिनिधी

पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या वाद्यवृंद संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशभक्तीपर गीतांनी भारावलेल्या या कार्यक्रमात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकारांनी सहभागी होत भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनाला संगीतमय मानवंदना दिली.

कार्यक्रमात ‘ऐ मेरे वतन के लोगो’, ‘संदेशे आते है’, ‘दिल दिया है जान भी देंगे’, ‘मेरा देश मेरा मुल्क’, ‘चिट्ठी आयी है’, ‘शूर आम्ही सरदार’ यांसह अनेक देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. या गीतांमुळे कार्यक्रमस्थळी देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. तसेच त्यांनी स्वतः देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, कोल्हापूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक राहुल माने, सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंग निकम, इस्माईल बागवान, महेश उत्तुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार तसेच सामाजिक, प्रशासकीय आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारांनी केवळ बातम्यांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपत देशभक्तीची भावना जनमानसात रुजविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला पत्रकार असोसिएशन ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. युवराज मोरे, उपाध्यक्ष नियाज जमादार, सचिवसागर ठाणेकर, कार्याध्यक्ष विजय यशपुत्त, संघटक शरद नारकर यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशभक्तीपर गीतांच्या सुरांनी भारावलेल्या या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची आठवण करून देत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यात आली.

See also  प्रचारात मिलिंद वाळंजची मोठी आघाडी, गावभेटीत घरोघरी राष्ट्रवादी पुन्हाचा निर्धार