गोकुळमध्ये अभूतपूर्व सत्तांतर! सतेज पाटील यांच्या आघाडीचा १४-९ ने दणदणीत विजय

मुख्यमंत्र्यांसह दहा आमदार, एका खासदाराच्या राजकीय ताकदीला धक्का;
 मुश्रीफ, डोंगळे, आबाजी पाटील, शौमिका महाडिक यांच्यासह दिग्गज पराभूत
काँग्रेसला मोठी उभारी, आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांत नवा उत्साह
कोल्हापूर (राजेंद्र मकोटे) : राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्रिमंडळातील दिग्गज, खासदार आणि आमदारांपर्यंतच्या नेत्यांनी प्रतिष्ठेची केलेली लढत, सहा महिन्यांहून अधिक काळ रंगलेले आरोप-प्रत्यारोप, प्रचारातील टोकाचे दावे आणि मतदारांमध्ये निर्माण झालेली कमालीची उत्सुकता अशा पार्श्वभूमीवर आशिया खंडातील सर्वांत मोठ्या सहकारी दूध संघांपैकी एक असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मध्ये अभूतपूर्व सत्तांतर घडले आहे. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने १४-९ अशा फरकाने बाजी मारत सत्ताधारी गटाला धूळ चारली. या निकालाने केवळ गोकुळमधील सत्तासमीकरणच बदलले नाही, तर कोल्हापूरच्या राजकारणातही नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

गोकुळच्या निवडणुकीकडे यंदा केवळ एका सहकारी संस्थेची निवडणूक म्हणून पाहिले जात नव्हते. राज्याच्या राजकारणातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील दिग्गज नेत्यांनी या निवडणुकीत लक्ष घातल्याने तिचे स्वरूप प्रतिष्ठेच्या लढाईत झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, खासदार आणि आमदारांच्या सहभागामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकीय वर्तुळातही चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, या सर्व राजकीय ताकदीला आव्हान देत सतेज पाटील यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आणि गोकुळच्या सत्तेच्या चाव्या विरोधी आघाडीकडे गेल्या.

‘पंचवीस-शून्य’च्या दाव्याला मतदारांचा दणका!
या निवडणुकीत विरोधी आघाडीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती; तर सत्ताधारी गटाकडून एकतर्फी विजयाचे दावे करण्यात येत होते. खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या ‘२५-०’च्या दाव्याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. मात्र, प्रत्यक्ष निकालाने या दाव्याला छेद दिला. सत्ताधारी गटाला नऊ जागांवर समाधान मानावे लागले, तर सतेज पाटील यांच्या आघाडीने १४ जागा जिंकत निर्णायक आघाडी घेतली.
या निकालामुळे सत्ताधारी गटातील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. विद्यमान अध्यक्ष नावेद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक डोंगळे, आबाजी पाटील आणि शौमिका महाडिक यांच्यासह अनेक चर्चित चेहऱ्यांना मतदारांनी नाकारले. त्यामुळे गोकुळच्या सत्ताकारणात आता नव्या नेतृत्वाचा उदय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सतेज पाटील यांच्या रणनीतीची चर्चा
निवडणुकीच्या प्रचारात सतेज पाटील यांनी गोकुळच्या कारभाराचा आणि भविष्यातील अस्तित्वाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला. गोकुळ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा केंद्रबिंदू राहिला पाहिजे. या संस्थेत पक्षीय राजकारणाला थारा मिळू नये आणि कोणत्याही परिस्थितीत गोकुळचे अस्तित्व धोक्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
गोकुळच्या माध्यमातून हजारो दूध उत्पादक शेतकरी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे अर्थकारण चालते. त्यामुळे या संस्थेचा कारभार राजकीय वर्चस्वापेक्षा दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देणारा असावा, असा संदेश सतेज पाटील यांनी प्रचारातून देण्याचा प्रयत्न केला. सभासदांनी दिलेला कौल हा या भूमिकेला मिळालेला पाठिंबा असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे.
राज्यस्तरीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील संघटनात्मक बांधणी, सभासदांशी असलेला संपर्क आणि मतदानाच्या दिवशी केलेले नियोजन निर्णायक ठरल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शपथा, देवदर्शन आणि टोकाच्या प्रचाराला मतदारांनी नाकारले?
गोकुळच्या निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांबरोबरच भावनिक आणि धार्मिक संदर्भांनाही महत्त्व आले होते. विविध मंदिरांमध्ये शपथा घेणे, देवदेवतांच्या नावाने आवाहने करणे, तसेच शपथ मोडल्यास अनिष्ट घडेल किंवा देवीचा शाप लागेल, अशा स्वरूपाच्या प्रचाराची चर्चा रंगली होती.
काही ठिकाणी शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक होईल, तर काही ठिकाणी रेणुका देवीचा शाप लागेल, अशा टोकाच्या विधानांचा उल्लेख प्रचाराच्या संदर्भात झाला. मात्र, अशा भावनिक वातावरणातही सभासदांनी मतदानाचा निर्णय स्वतंत्रपणे घेतल्याचे निकालातून दिसून आले. सहकारी संस्थेच्या निवडणुकीत विकास, संस्थेचे भवितव्य आणि दूध उत्पादकांचे हित यांसारखे मुद्दे महत्त्वाचे ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या निवडणुकीतील चुरस निकालाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कायम राहिली. शौमिका महाडिक यांचा अवघ्या सात मतांनी पराभव झाल्याने या निकालाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. तसेच सहकारी पाटील यांचाही अवघ्या दोन मतांनी पराभव झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अत्यंत कमी मतांच्या फरकाने झालेल्या पराभवामुळे निवडणुकीतील प्रत्येक मताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
काँग्रेसला बळ; पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीकडे लक्ष
गोकुळमधील विजयामुळे काँग्रेस आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावलेल्या निवडणुकीत मिळालेला हा विजय काँग्रेससाठी राजकीय उभारी देणारा ठरू शकतो.
या विजयाचा परिणाम आगामी राजकीय घडामोडींवर कसा होणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पुणे विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गोकुळच्या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला उत्साह पुढील निवडणुकांमध्येही कायम ठेवण्याचा निर्धार काँग्रेसच्या गोटातून व्यक्त होत आहे.
सहकारातील सत्तांतराचे राजकीय पडसाद!
गोकुळची निवडणूक ही केवळ २५ संचालक निवडण्यापुरती मर्यादित नव्हती. सहकार क्षेत्रावरील वर्चस्व, दूध उत्पादकांचा विश्वास, स्थानिक राजकारणातील ताकद आणि राज्यस्तरीय नेतृत्वाची प्रतिष्ठा अशा अनेक मुद्द्यांचा या निवडणुकीशी संबंध जोडला गेला होता.
त्यामुळे १४-९ असा निकाल हा सतेज पाटील यांच्या आघाडीसाठी मोठे यश मानले जात आहे. दुसरीकडे, ‘पंचवीस-शून्य’सारखे दावे करणाऱ्या सत्ताधारी गटाला आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
गोकुळमध्ये घडलेले हे सत्तांतर कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाला नवी दिशा देणार की आगामी निवडणुकांतील राजकीय समीकरणांनाही धक्का देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
See also  गोकुळच्या निवडणुकीसाठी चुरशीने मतदान सुरू! हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क