


महावार्ता न्यूज ः- नामदेवराव मोहोळ विद्या व क्रिडा प्रतिष्ठान आणि मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मामासाहेब मोहोळ यांची ११९ वी जयंती, माजी खासदार अशोक मोहोळ यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, मीरा अशोक मोहोळ यांचा अमृत महोत्सव सोहळा आणि शीला सदानंद मोहोळ यांचा विशेष सत्कार आज आयोजित करण्यात आला होता.

यशवंतराव आणि वसंतराव यांच्या संस्कारांमध्ये घडलेले मामासाहेब मोहोळ आणि मामासाहेब मोहोळांच्या शिकवणीत मोठी झालेली आमची राजकीय पिढी यांनी राजकीय संस्कृतीचा आदर्श निर्माण केला होता. मात्र, सध्या देशहित केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱ्या पिढीचा अभाव दिसत आहे, अशी खंत ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार अशोक मोहोळ यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विदूर तथा नानासाहेब नवले, ज्येष्ठ विचारवंत आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, पुरंदर विधानसभेचे आमदार संजय जगताप, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, भोर विधानसभेचे आमदार संग्राम थोपटे, ज्येष्ठ साहित्यिका अश्विनी धोंगडे आणि माजी आमदार कुमार गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोक मोहोळ यांची ग्रंथतुला करण्यात आली.














