सवाई गंधर्वची मैफल संपली तरी पंडित संजय गरूड यांच्या सूरांचा गंध दरवळतोयच…,

महावार्ता न्यूज ः 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मैफल संपली तरी पंडित संजय गरूड यांच्या सूरांचा गंध दरवळतच आहे. मुळशीकर पं. संजय गरुड यांचे सुरेल व दमदार गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा सनई वादनानंतर प्रारंभ झाला होता. 

महोत्सवाची सुरुवात बुधवार दिनांक 13 डिसेंबर  रोजी सनई वादननंतर मुळशी तालुक्यातील लवळे गावचे सुपुत्र पंडित संजय गरुड यांनी आपल्या गायनाची सुरुवात विलंबित एकतालातील राग भिमपलास मधील अब तो बडी देर या ख्यालाने केली. त्यांनी गाताना किराणा घराण्याची परंपरा जपत आपल्या घुमारदार, धारदार आवाजात धीरगंभीर आलापी , रागवाचक आणि सौंदर्यपूर्वक स्वर समूह, ताना,बोलताना,बोल आलाप, बेहलावे यांसह आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्वतंत्र गायकीने राग सादर केला. त्यानंतर द्रुत तीनतालातील पारंपारिक बंदिश बिरज मे धूम मचाये श्याम सादर केली. हा छोटा ख्याल त्यांनी तीनही सप्तकातील चपळतान, भारदस्त आवाजातील गमकेची तान, खटके,मूर्की, अशा वैशिष्ट्यपूर्ण गायकीने सजवला.

किराणा घराण्याच्या गायकीसाठी केलेली साधना, व गाण्यातील भावोत्कटता यामुळे देश-विदेशातून आलेले रसिक श्रोतेभारावून गेले. त्यानंतर गरुडांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेला माझे माहेर पंढरी हा प्रसिद्ध अभंग गायला. या अभंगाने अवघ्या मंडपात भक्तीमय व भावपूर्ण वातावरणाने कळस गाठला. गरुड यांच्या संपूर्ण गायनाला रसिकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात वन्स मोअर -वन्स मोअर म्हणत उत्स्फूर्त दाद दिली. पंडित संजय गरुड यांच्या गायनाला हार्मोनियम- शांती भूषण देशपांडे, तबला- रोहन पंढरपूरकर, सारंगी- उस्ताद फारूक लतीफ खान, यासोबतच मुळशीतील शिरवली गावचे माऊली फाटक यांनी पखवाज, निवे गावचे सचिन चोरगे यांनी टाळ व भुकूम गावचे दिनेश माझिरे यांनी गायनसाथ केली. या सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट साथसंगत केली.


अशा जगप्रसिद्ध असलेल्या या संगीत महोत्सवात दोन वेळा गायलेले मुळशी तालुक्यातील पंडित संजय गरुड हे एकमेव गायक कलाकार आहेत. याद्वारे त्यांनी मुळशीच्या शिरपेचात एका वेगळ्याच मुळशी पॅटर्न ने मानाचा तुरा रोवला आहे.

See also  जनसेवा सहकारी बँकच्या पिरंगुट शाखेचे नविन जागेत स्थलांतर.


आपल्या मुळशी तालुक्यातही शास्त्रीय गायक वादक कलावंत घडावेत अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. कलावंत घडत असताना होणाऱ्या हाल अपेष्टा व अडचणी इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून मुळशीमध्ये एक सुसज्ज गुरुकुल उभे राहावे असा त्यांचा मानस आहे. त्यांचा हा मानस पूर्ण होण्यासाठी मुळशीतील कलेवर प्रेम करणाऱ्या दानशूरांनी पुढे होऊन मदतीचा हात द्यावा अशी विनंती गरुडांनी या निमित्ताने व्यक्त केली.