मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राच्या श्रावणीचा डबल धमाका

हल्दवानी ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉन प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकाची हॅटट्रिक झळकवली. ट्रायथले प्रकारातील वैयक्तिक व मिश्र रिले प्रकारात श्रावणी नीलवर्ण याने सुवर्ण पदकाचा डबल धमाका केला. पाठोपाठ श्रावणीसह मयांक चाफेकरने मिश्र दुहेरीत सुवर्ण व वैयक्तिक प्रकारात कांस्य पदकांची कमाई केली.

गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये हरियाणाच्या प्रतिस्पर्धींना मागे टाकून पुण्याची 16 वर्षीय श्रावणी नीलवर्णने सलग दोन सुवर्ण पदके जिंकून आजचा दिवस गाजविला. 18.57.27 मिनिटांत ट्रायथले शर्यत पूर्ण करून महिलांच्या वैयक्तिक प्रकारात श्रावणी नीलवर्णाने महाराष्ट्राचे वर्चस्व प्रस्थापित केले. याच प्रकारातील मिश्र रिले प्रकारात ‘ जय महाराष्ट्रा’चा जल्लोष दिसून आला. हरियाणा व गोवा संघाच्या जोडीला मागे टाकून श्रावणी नीलवर्ण व मयांक चाफेकर यांनी बाजी मारली. त्यांनी 18.20.45 मिनिटांत शर्यत पूर्ण करून अव्वल स्थान पटकवले. जितेंद्र खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणार्‍या श्रावणीने पर्दापणातच सुवर्ण यश संपादन केले आहे. दहावीच्या परिक्षेचा त्राण असतानाही जिद्दीने सराव करून पदक जिंकण्याचा करिश्मा श्रावणीने केला आहे.
ट्रायथलॉन शर्यतीत पुरूषांच्या वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्राने दिवसातील सलग तिसरे पदक जिंकले. ठाणेच्या मयांक चाफेकरने 16.34.10 मिनिटांत शर्यत पूर्ण करीत कांस्य पदक संपादन केले. यजमान उत्तराखंडच्या आदित्य नेगीने सुवर्ण तर हरियाणाच्या बसंत तोमरने रौप्यपदक जिंकले.महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर व पथकप्रमुख संजय शेटे, उदय डोंगरे यांनी पदकविजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.स्पर्धेतील महाराष्ट्राने हे चौथे पदक आहे.
See also  मुळशीत जिल्हा बँकांचा क्रांतिकारी निर्णय,  विकास सोसायटींमार्फत भात खरेदी करणार