


राष्ट्र सेविका समितीच्या सघोष संचलनाचे – रांगोळया – पुष वृष्टी सह चौका चौकात स्वागत
कोल्हापूर – र गेली 90 वर्षे महिलांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कार, आत्मविश्वास आणि संघटनशक्ती जागृत करण्याचे काम करीत असलेल्या राष्ट्र सेविका समिती च्या सघोष संचलनातून महिला शक्ती, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडले. चौका चौकात नागरिकांनी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून त्याचे स्वागत केले
साने गुरुजी वसाहत च्या मैदानावरून संचलनाची सुरुवात झाली. साने गुरुजी वसाहत, राधानगरी रोड, काशीद कॉलनी मधून गेलेल्या
संचलनाच्या मार्गावर स्थानिक तरुण मंडळे नागरिकांनी आकर्षक रांगोळ्या, ठिकठिकाणी घातलेल्या फुलांच्या पायघड्या यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते . घोषाच्या निनादात शिस्तबद्ध पावले टाकत पुढे सरकणाऱ्या सेविकांचे संचलन पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. घोषातून उमटणारे तालबद्ध स्वर, सेविकांची एकसमान पावले आणि आत्मविश्वासपूर्ण वाटचाल यांमुळे संचलनाला विशेष भारदस्तपणा प्राप्त झाला.
या कार्यक्रमाला राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत बौद्धिक प्रमुख सौ. मैत्रेयी ताई शिरोळकर आणि प्रांत तरुणी प्रमुख पद्मप्रिया ताई जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली.
संचलनापूर्वी शस्त्र पूजन झाले. त्यासाठी कोल्हापूरच्या नगरसेविका सौ. दीपा ठाणेकर, सौ.माधुरी नकाते व पूजा राणे उपस्थित होत्या . या शस्त्रपूजनातून शक्ती, शौर्य, आत्मसंरक्षण आणि राष्ट्ररक्षणाचा संदेश देण्यात आला. यानंतर सौ. मैत्रेयी ताई शिरोळकर यांनी उपस्थित सेविकांचे उद्बोधन केले. राष्ट्रभक्ती, संघटन, शिस्त आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य यांचे महत्त्व त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
या सघोष संचलनामध्ये राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहर कार्य वाहिका गौरी मुजुमदार, प्राची लागू, प्रज्ञा परांजपे, देवयानी पलूसकर चिन्मयी कोटी, जिज्ञासा दुदगीकर व अन्य सेविकांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास एकूण समिती सेविका, सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर- नागरिक उपस्थित होते.








