मुळशीत 18 हजार कुणबी नोंदी, पुरावा असल्यास कुणबी दाखले दिले जाणार : तहसीलदार भोसले

महावार्ता न्यूज: मुळशीत ८० टक्के गावांच्या  तपासणी  कुणबीच्या अठरा हजार नोंदी सापडल्या आहेत. सबळ पुरावा जोडल्यास तहसील कार्यालयाकडून कुणबी दाखले दिले जातील असे तहसीलदार रणजीत  भोसले यांनी सांगितले आहे. 
मुळशीत तालुक्यात तहसील कार्यालयात सध्या कुणबी नोंदी तपासणी काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ८० टक्के गावांची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये कुणबीच्या अठरा हजार नोंदी सापडल्या आहेत. राज्य सरकारच्या महसूल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर गावनिहाय या नोंदी प्रसिद्ध केल्या आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्राथमिक, माध्यमिक शाळा, तहसील कचेरीतील जन्म- मृत्यू रजिस्टर यामधील कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशा नोंदी तपासण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार शाळांमधील प्रवेश रजिस्टर, तसेच महसूलमधील गाव नमुना नंबर १४ मध्ये सन १९०० ते सन १९६७ पर्यंत असलेल्या नोंदींची तपासणी केली. हे काम ८० टक्के झाले आहे.
मुळशीत आतापर्यंत अठरा हजार नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीच्या रजिस्टरमधील पानांची प्रत www. maharashtra.gov.in आणि https://pune.gov.in/kunbi- records-found- in-revenue- records/ या संकेतस्थळावर गावनिहाय अपलोड करून प्रसिद्ध केल्या आहेत.
कुणबी दाखला मिळविण्यासाठी अर्जदार यांनी आपल्या कुटुंबातील जन्म, मृत्यू नोंदीमध्ये कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी नोंद असलेला पुरावा, तसेच वंशावळीचे प्रतिज्ञापत्र, वंशावळ सिद्ध करणारे सर्व पुरावे, महसूल दप्तरी असलेले जुने सातबारा उतारे, फेरफार, तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडून दिल्यास तहसील कार्यालयाकडून कुणबी दाखला देण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली.
See also  मुळशी इंडस्ट्रिअल असोसिएशनवतीने भूगाव ग्रामपंचायतीचा सन्मान पत्राने गौरव, मुळशीकरांकडून मानले आभार