पैलवान ग्रंथालय हा कुस्ती क्षेत्राची विधायक ओळख ठरावी! – खासदार धनंजय महाडिक यांची अपेक्षा; पाच तालमींना पुस्तक संच व पुस्तक स्टँड भेट

कोल्हापूर 21 (राजेंद्र मकोटे)

आधुनिक काळात कुस्ती क्षेत्रात शक्तीबरोबरच युक्तीचेही महत्त्व वाढले आहे. तंत्रज्ञान आणि काळानुरूप होणारे नवनवीन बदल आत्मसात करणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी नियमित व्यायामाबरोबरच पैलवानांनी चौफेर वाचनाची सवय जोपासणे अत्यावश्यक आहे. या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेला ‘पैलवान ग्रंथालय’ हा उपक्रम कुस्ती क्षेत्राची विधायक ओळख ठरण्याबरोबरच इतरांसाठीही अनुकरणीय पाऊलवाट ठरेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

सौ. वंदना दत्तात्रय सपकाळ (माई) यांच्या एकषष्ठीनिमित्त आयोजित ‘पैलवान ग्रंथालय’ उपक्रमाच्या बोधचिन्ह अनावरण आणि पाच तालमींना ग्रंथसंच व पुस्तक स्टँड प्रदान करण्याच्या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते.

क्रीडाप्रेमी लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीतून कुस्तीप्रेमी सपकाळ परिवाराने या विधायक उपक्रमाची सुरुवात करणे ही समस्त शाहूप्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार महाराष्ट्रातील सर्व तालमींपर्यंत व्हावा, अशी अपेक्षाही खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय पदकविजेते कुस्ती प्रशिक्षक राम सारंग यांनी युवा पैलवानांना मार्गदर्शन करताना डोपिंगच्या मोहापासून दूर राहून कठोर परिश्रम, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. माजी खासदार निवेदिता माने यांनीही उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. महिला खेळाडूंसाठी आज विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून, महिलांनी या संधींचे सोने करावे, असे त्यांनी नमूद केले.
मुख्य समन्वयक गिरीश सपकाळ यांनी आगामी काळात ‘पैलवान ग्रंथालय’ उपक्रमाचा तालुकास्तरापर्यंत विस्तार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
पाच तालमींना ग्रंथसंपदा भेट या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पाच कुस्ती संस्थांना पुस्तक संच व पुस्तक स्टँड भेट देण्यात आले . यामध्ये .
1) मुरगूड येथील स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय क्रीडा संकुल.,

2) कोपर्डे, ता. करवीर येथील करवीर कुस्ती संकुल.,

3) जय भवानी शाहूपुरी तालीम. शिंगणापूर येथील राजर्षी शाहू कुस्ती केंद्र.

4) गणेशनगर येथील राष्ट्रकुल कुस्ती संकुल यांचा समावेश होता .

See also  पैलवान ग्रंथालय उपक्रमाचा कोल्हापूरी शनिवारी प्रारंभ : लोगो अनावरण आणि तालीम संस्थांना पुस्तक स्टँड आणि संच भेट

5) माननीय प्राध्यापक रामचंद्र सारंग सरांचे राष्ट्रकुल कुस्ती संकुल
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पैलवान हंगेश्वर धायगुडे यांनी केले. यावेळी पुण्याहून आलेले संदीप भाऊ धायगुडे, दत्ता आबा चव्हाण, अशोक जाधव, नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह संयोजक, समन्वयक, पैलवान शरद आबा जगदाळे, राजेंद्र आप्पा जगताप, रियाज भाई, संजय संतोष ताकवले, ऋषिकेश धायगुडे तसेच शाहूपुरीचे आसिफ नदाफ आणि कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .