


सामुदायिक उद्देशिका वाचन, संविधान दिंडी, रांगोळी आणि चित्र प्रदर्शनाचे आयोजन
कोल्हापूर 26 (राजेंद्र मकोटे)
भारतीय संविधान दिनानिमित्त शिंगणापूर येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि बौद्ध समाज शिंगणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात सामुदायिक संविधान उद्देशिका वाचन, संविधान रॅली आणि विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
करवीर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पाटील आणि शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यानिमित्ताने सकाळी शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी गावातून संविधान दिंडी काढली. विद्यार्थ्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश देत नागरिकांमध्ये संविधानाविषयी जनजागृती केली.
बौद्ध समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या संविधान उद्देशिका फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्व शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची मूलभूत माहिती असणारी कार्ड वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी यानिमित्ताने आकर्षक रांगोळी आणि चित्र प्रदर्शन भरवून संविधानातील मूल्ये कलात्मक पद्धतीने सादर केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सहाय्यक गटविकास अधिकारी सुहास पाटील यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले. एवढा मोठा भारत देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे एकसंध आणि अबाधित राहिला आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचा आदर करावा, असे आवाहन करताना शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नयेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे यांनीही संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. आज आपण सन्मानाने जीवन जगत आहोत, त्याचे सर्व श्रेय भारतीय संविधानाला जाते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विभागीय केंद्रप्रमुख राणेश्वर थोरबोले, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासो कांबळे, नालंदाचे अध्यक्ष रामचंद्र कांबळे, बुद्ध विहार अध्यक्ष विजय यशपुत्त, हाउसिंग सोसायटीचे चेअरमन तुषार कांबळे, मुख्याध्यापक अशोक कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तनुजा कांबळे, शिक्षक विजय कुशान, बाजीराव जाधव, सुषमा डवरी, अपर्णा भंडारी यांच्यासह बौद्ध समाजातील देवदास कांबळे, कौतुक कांबळे, राजेंद्र कांबळे, धोंडीराम कांबळे, अनिल कांबळे, हरीष कांबळे, सुशीलकुमार कांबळे, स्वाती कांबळे, मंगेश कांबळे, प्रतिक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा जागर करत शिंगणापूर येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.













