


कोल्हापूर ०९ (राजेंद्र मकोटे)
येत्या 11 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन भवानी मंडप येथे येत्या रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. दुष्काळ व आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर यंदा दसरा महोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या नवरात्र महोत्सवात जिल्हा प्रशासनातर्फे कोल्हापूरवासियांसाठी अनेक उपक्रम साजरे होणार आहेत या उपक्रमाला जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केले .
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज आयोजित करण्यात आलेल्या दसरा महोत्सव आढावा बैठक प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.
स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान होणाऱ्या या महोत्सवामध्ये येत्या सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळां, महाविद्यालयांमध्ये पारंपारिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी – विद्यार्थिनीं ,पालक , शिक्षक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.तसेच या उपक्रमांतर्गंत महिलांचीही बाईक रॅली आयोजित करण्यात येणार आहे. या दोन्ही उपक्रमांचे रिल्स तरुणाईने आणि बाईक रॅलीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी विविध समाज माध्यमांवर प्रसारित करावेत अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
या आढावा बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव,जि.प उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव,मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, तहसीलदार स्वप्निल पवार, तेजस्विनी पाटील,माध्य. शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, प्राथ.शिक्षणाधिकारी श्री घुगे,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी मनोज ओतारी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख,जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, देवस्थान समिती सचिव श्रीमती वर्षा साळुंखे,क्रांतीकुमार मिरजकर,(मनपा)अग्निशमन दलाचे मनीष रणभिसे यांच्यासह इतर अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.














