निसर्ग संवर्धनासाठी कायद्यासोबतच समाजाच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे : अॅड. धनंजय पठाडे

 

वसुंधरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा वर्धापन दिन व ‘वसुंधरा पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात संपन्न

कोल्हापूर 23 (राजेंद्र मकोटे)
“केवळ कडक कायदे करून निसर्ग वाचणार नाही, तर त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आणि प्रत्येकाने आपले मूलभूत कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. स्वच्छ व प्रदूषणमुक्त पर्यावरणात जगणे हा संविधानाने आपल्याला दिलेला मूलभूत अधिकार असून, निसर्गाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्यही आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. धनंजय पठाडे यांनी केले.
येथील शाहू स्मारक भवनमध्ये वसुंधरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘वसुंधरा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
या सोहळ्यात बोलताना प्राचार्या डॉ. आरती भोसले म्हणाल्या की, “वाढत्या सिमेंटच्या जंगलांमुळे आणि प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. आज पुरस्कार मिळालेल्या या ध्येयवेड्या व्यक्तींचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे.” प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन प्राचार्या भोसले यांनी केले.
यावेळी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंधारण तसेच विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘वसुंधरा पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी बायोमेडिकल वेस्ट नष्ट करण्याचे कार्य करणाऱ्या एस. एस. सर्व्हिसेस कंपनीसह रेंदाळ येथील कृष्णात जाधव महाराज, मुकादम अरुण जमादार, समर्थ विद्यामंदिरचे अध्यापक कृष्णा कांबळे, छत्रपती शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आरती भोसले, गायक सचिन पन्हाळकर, गायक दिगंबर कुलकर्णी, नेत्रचिकित्सक डॉ. रोहित चोकाककर, आदर्श अंगणवाडी सेविका पुष्पा कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हेमा पाटील, इरफाना नाईकवाडी, प्रज्ञा कांबळे आणि रत्नकांत चौगुले आदींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्याध्यक्ष अमोल कुरणे यांनी केले. या सोहळ्याला संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा कडोलकर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजा मकोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन पृथ्वीराज कडोलकर यांनी केले.

See also  भुकूूम मठातील किर्तन महोत्सवला मोठा प्रतिसाद, सोमवारी 19 फेब्रुवारीला भंडारा
पूर्वीचा लेखपंचगंगा नदी घाटावर रंगणार भव्य दीपोत्सव!
राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे - ( एम ए - मराठी / राज्य शास्त्र / जैन - पाली भाषा ) एम जे सी ( पत्रकारिता - संवाद शास्त्र ) गेली 28 वर्ष कार्यरत - दै सकाळ विद्यार्थी वार्ताहार पासून सामना - ब्युरो चिफ - दै . पुढारी - वाणिज्य आरोग्य पत्रकार - - उद्योग - आरोग्य - विकास पत्रकारिता विशेष लेखन - - सीपीआर - सिध्दगिरी हॉस्पीटल मध्ये 8 वर्ष जनसंपर्क - आरोग्य शिबीर संयोजन - गेली २० वर्षात ४०० हून अधिक आरोग्य - रक्त दा न - नेत्रदान - देहदान संकल्प शिबीराचे आयोजन - जिल्हा रक्त दाते समन्वय समिती सदस्य स्वत : ९० हून अधिक वेळा रक्तदान ( o - ve )