


छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2026
बदलापूरमध्ये इनडोअर क्रीडासंकुल
उभे करणार ः आ. किसन कथोरे
बदलापूर : चांगल्याप्रकारची क्रीडासंकुल ज्यावेळी उभे रहातील तेव्हा देशातून राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडतील, यासाठी बदलापूर शहरात इनडोअर क्रीडासंकुल उभे करणार असल्याचे घोषणा आमदार किसन कथोरे यांनी आज राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. उत्साही क्रीडामय वातावरणात शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे शानदार उद्घाटन बुधवारी करण्यात आले.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा प्रथमच बदलापूरला आयोजन केले आहे. हेंद्रेपाडामधील बदलापूर जिमखाना मैदानावर रंगलेल्या स्पर्धेचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदच्या नगराध्यक्षा श्रीमती रूचिता घोरपडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्यधिकारी मारूती गायकवाड, नगरसेवक किरण भोईर, माजी नगराध्यक्षा राजेंद्र घोरपडे, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे संजय नाईक, निलेश जगताप, उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते.
ढोल-ताशाचा गजरात मराठमोळे फेटे परिधान करीत उत्साहपूर्ण मिरवणूकीने बदलापूरमधील राज्य व्हॉलीबॉल स्पर्धेचा प्रारंभ झाला. यानंतर स्पर्धेचे शानदार उद्घाटन बदलापूर जिमखाना मैदानात रंगला. शाहिर नंदेश उमप यांच्या सांस्कृतिक मेजवानीसह जिम्नॉस्टिक्सची चित्तथरारक प्रात्यक्षिके उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. मैदानेचे पूजन करून हवेत स्पर्धेच्या बोधचिन्हासह फुगे सोडून स्पर्धेस सुरूवात करण्यात आली.

बदलापूरमधील व्हॉलीबॉल स्पर्धा ही ऐतिहासिक होईल असे सांगून श्रीमती रूचिता घोरपडे पुढे म्हणाल्या की, बदलापूर जिमखाना हे शहराचे वैभव आहे. शहरातील ५ क्रीडांगणे खेळाडूंसाठी उपलब्ध असून भविष्यात यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होतील. बदलापूरमधील स्पर्धा ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा असल्याचे वातावरण दिसून येत आहे. क्रिकेटशिवाय इतर खेळातही करीअर होऊ शकते असे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे यांच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी मानले.
१३ ते १७ मे २०२६ कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्यतील ८ विभागातील ३८४ खेळाडूंचा थरार रंगणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना २३ लाख ३५ हजारांची रोख बक्षिसे व करंडक, पदके देणार येणार आहे. स्पर्धेत कोल्हापूर, लातूर, अमरावती, संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई व नाशिक या संघात चुरशीच्या लढती सुरू झाल्या आहेत. १८ व २१ वर्षांखालील युवकांचा व्हॉलीबॉलचा थरार प्रथमच बदलापूरमध्ये पहाण्यास मिळणार आहे.
डिजीटल वॉटर बॉटलने भारावले खेळाडू
बदलापूरमधील राज्य व्हॉलीबॉल स्पर्धातील सहभागी सर्व ३२ संघाच्या ३८४ खेळाडूंनी स्मरणीय भेटवस्तू देत स्वागत करण्यात आले. डिजीटल डिजीटल वॉटर बॉटलसह सॅक, कॅप आणि ओआरएसची पाकिटे खेळाडूंना देण्यात आली. तापमान दर्शविणाऱ्या डिजीटल वॉटर बॉटलने खेळाडू भारावून गेले होते. प्रथमच तापमान दर्शविणारी पाण्याची बाटली खेळाडूंच्या हाती आली होती. भर उन्हाळ्यात बदलापूरचे तापमान किती हे क्षणात खेळाडूंना समजून आले. तसेच उन्हापासून सरंक्षण होण्यासाठी ओआरएसची पाकिटे दिल्याने खेळाडू खुश असल्याचे दिसून येत होते.














