गोकुळच्या सत्तासंघर्षात ९ नोव्हेंबरला सतेज पाटलांचे आक्रमक शक्तिप्रदर्शन!

संविधान बचाव रॅली काढून दाखवाच… थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनाच आव्हान!
चौका चौकात लागले बोर्ड 
कोल्हापूर विशेष वृत्त (राजेंद्र मकोटे) : गोकुळच्या सत्तासंघर्षाने आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून थेट राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू गाठला आहे. अवघ्या एका मताच्या बहुमतावर टिकलेली सत्ता, शासकीय सदस्यांच्या नियुक्त्या आणि गेल्या आठवडाभरातील वेगवान राजकीय घडामोडी यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या ९ नोव्हेंबरला कोल्हापुरात निघणारा भव्य मोर्चा हे केवळ आंदोलन नसून सतेज पाटलांच्या राजकीय शक्तीचे थेट प्रदर्शन ठरण्याची चिन्हे आहेत.
गोकुळचा स्थानिक सत्तासंघर्ष आता महाविकास आघाडी विरुद्ध राज्यातील सत्ताधारी महायुती अशा व्यापक राजकीय संघर्षाचे स्वरूप धारण करीत आहे.
विशेष म्हणजे, समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या प्रचारचित्रांमधून ‘फडणवीस सरकार तुमचे, मुख्यमंत्री-गृहमंत्री तुम्हीच; मग कोल्हापुरात संविधान बचाव रॅली काढून दाखवाच!’ असे थेट आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे. या आक्रमक भूमिकेमुळे मोर्चाला केवळ गोकुळच्या राजकारणापुरते मर्यादित न ठेवता राज्यव्यापी राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांपासून राज्यातील अर्ध्याहून अधिक मंत्रिमंडळ आणि आता थेट राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत गोकुळच्या राजकारणाची चर्चा पोहोचली आहे. त्यामुळे आशिया खंडातील या सहकारी दूध संघाची चेअरमन निवड ही आता केवळ पदाची निवड न राहता राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला मिळालेला दहापैकी दहाचा कौल आणि आज गोकुळमध्ये निर्माण झालेली निसटत्या बहुमताची परिस्थिती यांची राजकीय तुलना सुरू झाली आहे. समाजमाध्यमांवरील दावे-प्रतिदावे आणि नेत्यांच्या आक्रमक विधानांतून आगामी संघर्षाची तीव्रता जाणवत आहे.
येत्या ९ नोव्हेंबरचा मोर्चा आणि १० नोव्हेंबरची चेअरमन निवड, या दोन दिवसांत कोल्हापूरच्या राजकारणाचीच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांचीही दिशा स्पष्ट होणार आहे.गोकुळच्या सत्तेची लढाई नेमकी कोणाच्या बाजूने झुकते, यापेक्षा या संघर्षातून कोण आपली राजकीय ताकद सिद्ध करतो, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

गोकुळच्या दुधातून राज्याच्या राजकारणाला उकळी फुटली आहे; आता ९ नोव्हेंबरचा मोर्चा ही त्या उकळीची राजकीय धार किती तीव्र आहे, याचीच परीक्षा ठरणार आहे! याची प्रचिती तालुका – गाव पातळी सह कोल्हापूर शहरातील चौका चौकात आणि तालीम संस्थानी मोर्चा सहभागी लावलेल्या डिजिटल फलकांनी तीव्रतेने येत आहे आहे . या पार्श्वभूमीवर स्थानिक दोन्ही आघाडीच्या प्रमुखांनी चेअरमन पदासाठी समन्वयी मार्ग काढल्यास आमची हरकत असणार नाही आणि त्यांनी तो समन्वय करावा असे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे केले असलेले त्याची उलट सुलट चर्चा आता सर्वत्र रंगात आली आहे मोर्चा सहभागी असणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने या संदर्भात काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील कोणती जाहीर भूमिका व्यक्त करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले .
See also  मुळशी पंचायत समिती आरक्षण जाहिर, पौड,माण, पिरंगुट,भूगाव सर्वसाधारण