५० हजार पणत्यांच्या प्रकाशाने पंचगंगा घाट उजळला!

प्रबोधनपर रांगोळ्या, सुरेल गीत-संगीताची मेजवानी; शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या दीपोत्सवाने त्रिपुरारी पौर्णिमा ठरली अविस्मरणीय
कोल्हापूर (राजेंद्र मकोटे) : पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या, कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीच्या घाटावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तब्बल ५० हजार पणत्यांच्या प्रकाशाने अवघा परिसर उजळून निघाला. दीपज्योतींचा लखलखाट, सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या आणि गायक महेश हिरेमठ व समूहाने सादर केलेल्या सुरेल गीत-संगीतामुळे हा दीपोत्सव सोहळा संस्मरणीय ठरला. शुक्रवार पेठेतील शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने या भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

पंचगंगा नदी घाटाच्या प्रवेशद्वारावर साकारलेली भव्य शिवप्रतिमा आणि मस्कुती तलाव, उत्तरेश्वर पेठ येथील कार्यकर्त्यांनी उभारलेली अंबरनाथ मंदिराची प्रतिकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक प्रबोधनाची जोड या सोहळ्याला लाभली.

रोटरी क्लबच्या वतीने साकारलेल्या रांगोळ्यांमधून सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम अधोरेखित करण्यात आले. स्क्रीन टाइम कमी करून कुटुंबीय आणि मित्रपरिवाराशी प्रत्यक्ष संवाद वाढविण्याचा संदेश देण्यात आला. तसेच युवकांनी करिअर म्हणून पोलीस भरतीकडे पाहावे, असा प्रेरणादायी संदेशही रांगोळ्यांच्या माध्यमातून देण्यात आला.

सहजी स्टार दिपाली मगदूम यांनी साकारलेला कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा देखावा विशेष आकर्षण ठरला. कोल्हापुरी साज, कोल्हापुरी फेटा, श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी गूळ आणि कोल्हापुरी पायथण अशा वैशिष्ट्यपूर्ण परंपरांचे दर्शन या रांगोळीतून घडविण्यात आले. त्याचबरोबर जिवंत माशांच्या प्रतिकृतींसह साकारलेली फुलांची रांगोळी उपस्थितांसाठी कुतूहलाचा विषय ठरली.

विविध सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या वतीने भाविकांना दूध व चहाचे वाटप करण्यात आले. पंचगंगा महाआरती समूहाच्या वतीने सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याच समूहाने उभारलेला ‘नमामि पंचगंगे’ हा आकर्षक सेल्फी पॉईंट नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला. अनेकांनी या ठिकाणी छायाचित्रे काढून दीपोत्सवाच्या आठवणी जपल्या.
प्रदूषण आणि वाहतूक कोंडीने नाराजी

एकीकडे हजारो पणत्यांच्या माध्यमातून पंचगंगेच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना, दुसरीकडे काही बाबींमुळे पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. वारंवार आवाहन करूनही प्लास्टिकच्या वाट्यांमधून नदीत दीप सोडण्यात आल्याने नदी प्रदूषणात भर पडण्याची शक्यता निर्माण झाली. पंचगंगा नदीच्या स्वच्छतेविषयी जागरूक असलेल्या नागरिकांनी याबाबत खंत व्यक्त केली. तसेच जामदार क्लब, गायकवाड वाडा ते पंचगंगा हॉस्पिटल परिसरात समन्वयाअभावी मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे अनेक वाहनधारकांना बराच काळ अडकून पडावे लागले.
शहरभर दीपोत्सवाचा प्रकाशोत्सव
पंचगंगा नदी घाटासह हुतात्मा पार्क, महावीर गार्डन आणि रंकाळा तलाव परिसरातही पहाटे दीपोत्सव उत्साहात साजरा झाला. सायंकाळी सिनेतारकांच्या उपस्थितीत कसबा बावडा परिसरात, तर शहराच्या दक्षिण भागातील नवदुर्गांपैकी एक असलेल्या कात्यायनी देवी मंदिर परिसरात आणि पूर्व भागातील त्र्यंबोली देवी परिसरातही दीपोत्सवाची रोषणाई अनुभवायला मिळाली. अंबाबाई देवी काकडा समारोप
दिवाळीपासून सुरू असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिराच्या शिखरावर पहाटेपासून सुरू असलेल्या काकड आरतीचाही यानिमित्ताने समारोप झाला.
अशा प्रकारे शहराच्या विविध भागांत लक्ष लक्ष दीप प्रज्वलित करून श्रद्धा, संस्कृती, पर्यावरण जागृती आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा त्रिपुरारी पौर्णिमेचा दीपोत्सव कोल्हापूरकरांसाठी आनंददायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरला.

See also  राहुल पवळे, मंदा शेळके, काजल मोरे विजयी – मिलिंद वाळंज, आबा शेळके आघाडीवर
पूर्वीचा लेखनिसर्ग संवर्धनासाठी कायद्यासोबतच समाजाच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे : अॅड. धनंजय पठाडे
राजेंद्र सावित्री सदाशिव मकोटे - ( एम ए - मराठी / राज्य शास्त्र / जैन - पाली भाषा ) एम जे सी ( पत्रकारिता - संवाद शास्त्र ) गेली 28 वर्ष कार्यरत - दै सकाळ विद्यार्थी वार्ताहार पासून सामना - ब्युरो चिफ - दै . पुढारी - वाणिज्य आरोग्य पत्रकार - - उद्योग - आरोग्य - विकास पत्रकारिता विशेष लेखन - - सीपीआर - सिध्दगिरी हॉस्पीटल मध्ये 8 वर्ष जनसंपर्क - आरोग्य शिबीर संयोजन - गेली २० वर्षात ४०० हून अधिक आरोग्य - रक्त दा न - नेत्रदान - देहदान संकल्प शिबीराचे आयोजन - जिल्हा रक्त दाते समन्वय समिती सदस्य स्वत : ९० हून अधिक वेळा रक्तदान ( o - ve )